Last Updated on 24 Jan 2024 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । दहावी-बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आता परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे.राज्य मंडळाच्या या निर्णयामुळे सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षाध्यर्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते.
इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते.परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.
तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्यात येत आहे.
फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात सकाळी 11 वाजता तसेच दुपार सत्रात दुपारी 3 वाजता परीक्षा
दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल,सकाळ सत्रात सकाळी 10.30 वाजता तरोच दुपार सत्रात दुपारी 2.30 वाजता परीक्षार्थीनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे.
| परीक्षेची सध्याची वेळ | परीक्षेची सुधारीत वेळ |
| सकाळी 11 ते दुपारी 2 | सकाळी 11 ते दुपारी 2:10 |
| सकाळी 11 ते दुपारी 1 | सकाळी 11 ते 1:10 |
| सकाळी 11 ते दुपारी 1.30 | सकाळी 11 ते दुपारी 1.40 |












































































