Last Updated on 14 Oct 2023 11:40 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरवात होत आहे.त्यामुळे घरोघरी स्वच्छता मोहीम गेल्या आठ-दहा दिवसांपासून सुरु आहे.बहे येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या पाच-सहा दिवसांपासून गर्दी होत आहे.नदी पात्रातील खडकांवर विविध रंगाची अंथरूण-पांघरूणे वाळत घातल्याने हा परिसर दिवसभर ‘कलरफुल’ दिसत आहे.
पितृ पंधरवड्यानंतर घटस्थापना होत असते.रविवार,15 ऑक्टोबर रोजीच्या घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरवात होणार आहे.भारतीय संस्कृतीमध्ये नवरात्री व दसऱ्याच्या सणाला महत्त्वाचे स्थान आहे.नवीन कार्याच्या शुभारंभासाठीही हा दिवस शुभ समजला जातो.त्यामुळे घराच्या स्वच्छतेबरोबरच घरातील कपडे,कापडी साहित्य,भांडीकुंडी यांची साफसफाई केली जात आहे.त्यातील एक भाग म्हणून घरातील अंथरूण-पांघरूण अशी सर्व कपडे स्वच्छ केली जातात.
हेही वाचा – बहे रामलिंग बेटावर भाविकांची वाढती गर्दी
दरवर्षी बहे येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीपात्रात कपडे धुण्यासाठी या काळात लोकांची गर्दी असते.गेल्या पाच-सहा दिवसापासून ही गर्दी वाढली आहे.या ठिकाणी महिला मंडळींबरोबरच पुरुष व बच्चेकंपनींची कपडे धुण्यासाठी गर्दी होत आहे.आजूबाजूच्या परिसरातून तसेच सातारा जिल्ह्यातूनही मोठ्याप्रमाणावर लोक येथे कपडे धुण्यासाठी येत आहेत.
बहे रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीपात्रात मोठ-मोठे खडक आहेत.कपडे धुणे व वाळविण्यासाठी खडकांवर मुबलक जागा असल्याने येथे गर्दी होते.दिवसभर घरातील कपडे,अंथरूण-पांघरूणे वाळत घातले जातात.विविध रंगाची अंथरूण-पांघरूणे खडकांवर वाळवण्यासाठी पसरली जातात.विविध रंगाची कपडे वाळत घातल्याने हा परिसर दिवसभर रंगबिरंगी झालरीने सजल्याचे दिसत आहे.अगदी पहाटेपासून येथील रामलिंग बेट परिसरातील कृष्णा नदीकाठी लोक येत आहेत.आजूबाजूच्या गावातून समूहाने अनेक कुटुंबे येत आहेत. हा परिसर रंगीबेरंगी अंथरूण-पांघरूण तसेच विविध कपड्यांनी ‘कलरफुल’ झाला आहे.


तयारी दसऱ्याची… बहे : दसऱ्याच्या तयारीची लगबग सुरु आहे.अंथरूण-पांघरूण धुण्यासाठी अगदी पहाटेपासून येथील रामलिंग बेट परिसरातील कृष्णा नदीकाठी लोक येत आहेत.आजूबाजूच्या गावातून समूहाने अनेक कुटुंबे येत आहेत. ही बोलकी छायाचित्रे टिपली आहेत कु. संकल्पना पाटील हिने.















































































