सांगली । बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेटावर भाविक-पर्यटकांची गर्दी वाढत आहे.कौटुंबिक पर्यटक-भाविकांची विशेषकरून महिलांची मोठी गर्दी वाढत आहे.प्रभू श्रीराम व रामभक्त हनुमान यांच्या दर्शनासाठी पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक येत आहेत.त्यामुळे रामलिंग बेट परिसर गर्दीने गजबजून जात आहे.
प्राचीनतेबरोबरच धार्मिक महत्व प्राप्त झालेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बहे गावच्या पश्चिमेस असणाऱ्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून रामलिंग बेटाचा उल्लेख रामायण काळापासून केला जातो.इस्लामपूर पासून 10 कि.मी. व कृष्णा कारखान्यापासून सुमारे 7 कि. मी. अंतरावर कृष्णेच्या तीरावर हे वसलेले आहे.1884 च्या बॉम्बे गॅझेटमध्ये बहे गावाचा उल्लेख दिला आहे.
प्राचीन काळात ही भूमी दंडकारण्य म्हणून ओळखली जात होती.रामलिंग बेट हे गावाच्या पश्चिमेला कृष्णा नदीच्या पात्रात अंदाजे 1 कि.मी. लांब व अर्धा कि.मी. रुंद असलेल्या खडकावर तयार झाले आहे.कृष्णेच्या पाण्यामुळे निसर्गाचं वरदान या गावाला लाभलेले आहे.या कृष्णेच्या पात्रातील रामलिंग बेटाच्या निर्मितीला प्राचीन व धार्मिक असा इतिहास आहे.धार्मिक साहित्यात याचे अनेक दाखले मिळतात.
दर शनिवार-रविवारी भाविक-पर्यटकांची मोठी गर्दी
दरम्यान,रामलिंग बेटावर गेल्या वर्षभरापासूनच भाविक-पर्यटकांची गर्दी वाढत आहे.श्रावण महिना सुरु झाल्यापासून तर रामलिंग बेटावर मोठ्याप्रमाणात गर्दी होत आहे.समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या 11 मारुतींपैकी एक 11 वा मारुती या बेटावर आहे.दर शनिवार-रविवारी तर रामलिंग बेट परिसर भाविक-पर्यटकांच्या गर्दीने गजबजून जात आहे.एस.टी. महामंडळाने क्तांसाठी सवलतीच्या दरात देव दर्शनासाठी खास गाड्यांची सोय केलेली आहे.11 मारुती दर्शनासाठीही खास बसेस सुरु केल्या आहेत.त्याचा भाविक विशेष करून महिला मोठ्याप्रमाणात लाभ करून घेत आहेत.
सिनेसृष्टीचे आकर्षण; ‘प्री वेडिंग’ शूटसाठीही छायाचित्रकारांचा ओढा
बेटावर सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातुन विविध झाडे लावली आहेत.त्यामुळे बेटावर वनराई नटलेली आहे.हा परिसर आता सिनेसृष्टीचे आकर्षण ठरत आहे.’प्री वेडिंग’ शूटसाठीही छायाचित्रकारांचा ओढा याठिकाणी वाढला आहे.रामदुत फौंडेशनचे ‘स्वच्छता दुत’ येथील स्वच्छता राखण्यासाठी नेहमी तत्पर असतात.
रामलिंग बेटावर कसे याल ?
इस्लामपूर मार्गे बहे ते रामलिंग बेट.
कोल्हापूर मार्गे येवलेवाडी ते दंड भाग व रामलिंग बेट.
कराड मार्गे रेठरे कारखाना, नरसिंहपूर ते रामलिंग बेट.
हेही वाचा – ई-पीक पाहणी नोंदणी करा…अन्यथा विविध योजनांच्या लाभासाठी ठरणार अडचणीचे