Last Updated on 16 Sep 2024 8:22 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । निरोगी शरीर,सात्विक आहार आणि निर्मळ मनाने तुम्ही तुमच्या जीवनाची उंची वाढवित जीवनात यशस्वी बनवू शकता,असा विश्वास घारेवाडी (ता.कराड) येथील शिवम अध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ.इंद्रजित देशमुख यांनी राजराम नगर येथे बोलताना व्यक्त केला. जगण्याचा समारोप गोड करण्यासाठी आयुष्यात चांगली कर्मे करा. माणूस दोन-अडीच वर्षात बोलायला शिकतो. मात्र काय,किती,आणि कसे बोलावे हे शिकण्यात त्याचे आयुष्य जाते, अशी खंतही व्यक्त केली.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील,संचालक बाळासाहेब पवार,प्रदीपकुमार पाटील,प्रताप पाटील,कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, कामगार नेते शंकरराव भोसले प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डॉ.देशमुख म्हणाले,माणुसकी जपणारा आणि आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडणार अधिकारी मस्त असतो. हा मस्त अधिकारी आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बलस्थाने ओळखून या बलस्थानांचा आपल्या संस्थेच्या प्रगती साठी चांगला उपयोग करून घेत असतो. सुस्त,त्रस्त आणि व्यस्त अधिकारी संस्थेसाठी भारच असतो. कर्मचाऱ्यांचे अपयशी,कृत्रिम अपयशी,कृत्रिम यशस्वी आणि यशस्वी असे चार प्रकार आहेत. यशस्वी कर्मचारी आपली जबाबदारी ताकदीने पूर्ण करीत असतो. डॉ. देशमुख यांनी दीड तासाच्या भाषणात व्यसन मुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले. त्यांनी आपल्या मित्रांची ह्रदयस्पर्शी उदाहरणे ऐकताना अनेक कामगारांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या.
संचालक अतुल पाटील,शैलेश पाटील, रघुनाथ जाधव,बबनराव थोटे,वैभव रकटे, दिलीपराव देसाई,रमेश हाके,हणमंत माळी, राजकुमार कांबळे,विकास पवार,मनोहर सन्मुख,राजेंद्र चव्हाण,तानाजी खराडे,एस. डी.कोरडे,विजय मोरे,संताजी चव्हाण,महेश पाटील यांच्यासह अधिकारी व कामगार उपस्थित होते.
सांस्कृतिक मंडळाचे सचिव विश्वनाथ पाटसुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. करमणूक समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील यांनी आभार मानले.












































































