Last Updated on 04 Nov 2024 7:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत राजाराम पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) निशिकांत प्रकाश पाटील अशी थेट लढत होत आहे. पण, जयंत पाटील व निशिकांत पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असणारे प्रत्येकी दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. उमेदवारांच्या नाव साधर्म्याचा नेमका फटका कोणाला बसणार याची निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज ९ उमेदवारांनी माघार घेतली. आता निवडणुकीच्या रिंगणात १२ उमेदवार राहिले आहेत. पण, खरी लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत राजाराम पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) निशिकांत प्रकाश पाटील यांच्यात होत आहे. त्यांच्यात जोरदार लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पण, दोन्ही गटाकडून नाव साधर्म्य असणाऱ्या प्रत्येकी दोघांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांनी आपापले उमेदवारी अर्ज ठेवले आहेत. उरुण इस्लामपूर येथील जयंत राजाराम पाटील व तांबवे येथील जयंत रामचंद्र पाटील यांचा अर्ज आहे. तर निशिकांत प्रल्हाद पाटील (कोरेगाव) निशिकांत दिलीप पाटील (बोरगाव) हे उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जयंत राजाराम पाटील (अपक्ष) यांना ग्रामोफोन, जयंत रामचंद्र पाटील (अपक्ष) यांना दूरदर्शन, निशिकांत दिलीप पाटील (अपक्ष) यांना मोत्यांचा हार तर निशिकांत प्रल्हाद पाटील (अपक्ष) यांना अंगठी अशी चिन्हे मिळाली आहेत.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे तीन तीन उमेदवार मैदानात उतरले आहेत. त्यामुळे विधानसभा मतदारसंघातील मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकाच नावाच्या व्यक्ती निवडणुकीत उभ्या केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, या निवडणुकीत एकाच नावाचे तीन उमेदवार असल्यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या नाव साधर्म्याचा नेमका फटका कोणाला बसणार याची निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
हेही वाचा – इस्लामपूरमध्ये अखेरच्या दिवशी ९ जणांची माघार, १२ उमेदवार मैदानात
असे आहे नाव साधर्म्य…
जयंत राजाराम पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार चिन्ह – तुतारी वाजवणारा माणूस
जयंत राजाराम पाटील – अपक्ष चिन्ह -ग्रामोफोन
जयंत रामचंद्र पाटील – अपक्ष चिन्ह – दूरदर्शन
निशिकांत प्रकाश पाटील – नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी चिन्ह -घड्याळ
निशिकांत दिलीप पाटील – अपक्ष चिन्ह -मोत्यांचा हार
निशिकांत प्रल्हाद पाटील – अपक्ष चिन्ह – अंगठी










































































