Last Updated on 06 Feb 2022 10:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
बीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
मुंबई ।
गानसम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मुंबईतल्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलिवूड विश्वाला आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.फक्त देशच नाही,तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते.कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या. त्या उपचाराला प्रतिसादही देत होत्या,मात्र त्यांची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली.श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.मात्र रविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.फक्त देशच नाही,तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केले आहे.
दरम्यान,लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्यावर अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे,केंद्रीय मंत्री पियुष गोयल,राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जाऊन लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.मुंबईतील पेडर रोड भागातील लता मंगेशकर यांच्या प्रभुकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मध्य प्रदेशातील इंदूर शहरात लता मंगेशकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक होते. मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या.लतादीदींना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले.
असा सुरू झाला गायन प्रवास
लता मंगेशकर यांनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा पार्श्वगायन केले. देश-विदेशातील तब्बल ३६ वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी असंख्य गाणी गायली आहेत.त्यांची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.तसेच, देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ही त्यांना देण्यात आला आहे.त्यांनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.१९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते.सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 22 भाषांमधील, 1800 पेक्षाही अधिक चित्रपटांमधून 25 ते 30 हजार गाणी गायली.’एक प्यार का नगमा है’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘एक राधा एक मीरा’ आणि ‘दीदी तेरा देवर दीवाना’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांना लता मंगेशकर यांनी स्वरसाज चढविला होता.
लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये पद्मभूषण, १९९९ मध्ये पद्मविभूषण आणि २००१ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना २००९ मध्ये ‘ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
लतादीदींच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.राष्ट्रीय दुखवटा जाहीर करताना त्या व्यक्तीचे सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि योगदान लक्षात घेऊन सरकार याविषयी निर्णय घेत असते. त्यामुळेच लता मंगेशकर यांच्या मृत्यूनंतर दोन दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकावला जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे.लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. लतादीदींच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू आणि काळजीवाहू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या यांच्या निधनानं बॉलिवूडमध्ये एक प्रकारची न भरुन निघणारी पोकळी निर्माण असल्याची भावना मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून स्मरण ठेवतील, ज्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती. अशा आशयाचे ट्विट करत लता दीदींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
‘स्वर आज हरपले..’, शरद पवार भावूक
लतादीदींच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे.
शरद पवार यांनी लता मंगेशकर यांच्यासोबतचा जुना फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या दिल्या सूचना
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?
भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.
लतादिदींच्या निधनानं संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं -उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.“लतादिदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘आद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादिदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभुती दिली. लतादिदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली. 1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादिदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादिदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला – देवेंद्र फडणवीस
“लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे. ” अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाजंली अर्पण केली आहे.
अलौकिक सूर हरपले – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख
“आपल्या अलौकिक सूरांनी संपूर्ण विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्र मूक झाले आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोक व्यक्त केला आहे.“लता दिदींनी आपल्या अतुलनीय सूरांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांना पडद्यावर आवाज देऊन त्यांचे व्यक्तिमत्व खुलविले. प्रत्येक भारतीयाच्या मनातील विविध भावभावना त्यांनी आपल्या गायनातून चपखलपणे व्यक्त केल्या. प्रदीर्घ काळ पार्श्वगायन क्षेत्रावर त्यांची मोहिनी होती आणि पुढेही राहील. देशाप्रती अत्यंत अभिमान असलेल्या लतादिदी संपूर्ण विश्वात भारताचा अभिमान म्हणून आदरास प्राप्त झाल्या. त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.लतादिदींशी देशमुख कुटुंबीयांचे निकटचे संबंध होते त्यांच्या जाण्याने मंगेशकर कुटुंबीयांना झालेल्या दुःखात देशमुख कुटुंबीय सहभागी आहेत “, असेही अमित देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंनी वाहिली श्रद्धांजली
भारतीयांच्या भावविश्वात अढळस्थान मिळविलेल्या ‘गानकोकिळा’ अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. लतादिदी मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होत्या.त्या बऱ्या होऊन परत येतील असा विश्वास होता. पण नियतीला हे मान्य नव्हते, असं ट्विट सुप्रिया सुळेंनी केलं आहे.
हे वाचा…!








































































