Last Updated on 30 Mar 2025 8:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । अजित पवारांकडून आलेल्या वक्तव्यानंतर राजू शेट्टी यांनी हल्लाबोल केला आहे. 31 तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? असा सवाल राजू शेट्टी यांनी केला.
‘सगळी सोंगं करता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. पण मी सांगतो की 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा,’ असे आवाहन अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना केले होते.
महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करताना अजितदादा यांना तिजोरीची कल्पना नव्हती का? शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जातं आहे. नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी देताना तिजोरीवर भार पडत नाही का? अशी विचारणा त्यांनी केली. ज्या तुमच्या लाडक्या साखर कारखानदारांना 2 हजार कोटीची थकहमी घेऊन कर्ज दिलात त्या कारखानदारांनी राज्यातील उस उत्पादक शेतक-यांची डिसेंबरपासून 7 हजार कोटी रूपयापेक्षा जास्त एफ.आर.पी थकीत ठेवली आहे. कांदा , सोयाबीन , कापूस व भाजीपाला उत्पादक शेतक-यांची तर माती झाली आहे .
गाडीचा एसी बंद पडला म्हणून लगेच जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या घेण्याची ऑर्डर देता, तुम्ही अत्यावश्यक झाला नसता पण राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष देणार? असे राजू शेट्टी म्हणाले. 2029 मध्ये निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.














































































