Last Updated on 15 Feb 2021 5:50 PM by
दुसरा कसोटी सामना : तिसरा दिवस
चेन्नई : रविचंद्रन अश्विनच्या शतकी खेळीनं चेन्नईच्या दुसऱ्या कसोटीत भारताला विजयाची संधी मिळवून दिली आहे.
अश्विननं घरच्या मैदानात खेळताना इंग्लंडविरुद्धच्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलं. त्यानं 148 चेंडूंमध्ये 14 चौकार आणि एका षटकारासह 106 धावांची खेळी केली. कसोटी क्रिकेटमधलं त्याचं हे पाचवं शतक आहे.
अश्विनच्या या शतकाच्या जोरावरच भारतानं या कसोटीच्या दुसऱ्या डावात सर्व बाद 286 धावांची मजल मारली आणि इंग्लंडला विजयासाठी 482 धावांचं लक्ष्य दिलं.
त्याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडची अवस्था तीन बाद 53 अशी बिकट झाली होती. दिवसाचा खेळ संपला, तेव्हा डॅन लॉरेन्स 19 धावांवर तर जो रूट दोन धावांवर खेळत होता.
इंग्लंडला विजयासाठी अजून 429 धावांची गरज असून त्यांच्या हातात सातच विकेट्स शिल्लक आहेत. दुसऱ्या डावात भारताच्या अक्षर पटेलनं दोन तर अश्विननं एक विकेट काढली आहे.
विराटचं अर्धशतक, स्पिनर्सचं वर्चस्व
चेपॉकच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवरील या सामन्यात तिसऱ्या दिवशीही फिरकी गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं. विराट कोहलीनं 62 धावांची खेळी करूनही दुसऱ्या डावात भारताची अवस्था 9 बाद 237 अशी झाली होती.
अश्विनलाही तब्बल तीन जीवदानंही मिळाली, पण त्याचा फायदा उचलतं अश्विननं मोहम्मद सिराजच्या साथीनं दहाव्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी रचली आणि भारताला सामन्यावर मजबूत पकड मिळवून दिली. सिराज 16 धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडकडून डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीच आणि ऑफस्पिनर मोईन अलीनं प्रत्येकी चार विकेट्स काढल्या.
रोहित, अजिंक्य ऋषभनं केलेली पायाभरणी
त्याआधी पहिल्या डावात भारताचा सलामीवर रोहित शर्मानं शतक ठोकलं होतं. रोहितच्या 161, अजिंक्य रहाणेच्या 67 आणि ऋषभ पंतच्या नाबाद 58 धावांच्या खेळीमुळे भारताला पहिल्या डावात 329 धावा करता आल्या.
पण पहिल्या इनिंगमध्ये शुभमन गिल, विराट कोहली, ईशांत शर्मा आणि कुलदीप यादव भोपळाही न फोडता माघारी परतले होते. मग इंग्लंडचा पहिला डावही 134 धावांत गडगडला होता. पहिल्या डावात अश्विननं चार तर अक्षर पटेलनं तीन विकेट्स काढल्या होत्या.














































































