Last Updated on 21 Nov 2023 9:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रका प्रमाणे सहकारी व खाजगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत.त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.परंतु आजच्या बैठकीत याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने आजची बैठक निष्फळ ठरली आहे.
राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नसंदर्भात दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे दुपारी बैठक झाली.राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती.यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अजित नवले, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्या. (महानंद) मुंबईचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील आणि रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंडे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त अजित पवार, अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ विभागीय प्रमुख आणि राज्यातील प्रमुख सहकारी व खासगी दूध संघाचे प्रतिनिधी, पशुखाद्य उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हेही वाचा – …तर मी राजकारण सोडतो, सदाभाऊंचे राजू शेट्टींना ओपन चॅलेंज
परंतु आजच्या बैठकीत याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने आजची बैठक निष्फळ ठरली आहे.त्यामुळे आज सदाभाऊ खोत,अजित नवले तसेच रयत क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांनी या शासन परिपत्रकाची सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे होळी केली. तसेच येत्या २४ नोव्हेंबरला राज्यभर या शासन परिपत्रकाची होळी करण्यात येणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
शासन परिपत्रकाची होळी करताना रयत क्रांती पक्षाचे कार्याध्यक्ष दीपक भोसले, प्रवक्ते प्रा. सुहास पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष संदीप वाहुळे, पंढरपूरचे सुनील पाटील, राहुरीचे सतीश पवार, भाऊसाहेब मांडे आदी उपस्थित होते.









































































