कोल्हापूर । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागील वर्षाच्या ऊसाला प्रति टन ४०० रुपये अधिक आणि यावर्षीच्या हंगामासाठी प्रति टन एक रकमी ३,५०० रुपये दराची मागणी केली आहे.त्यांनी हा दर मिळवून दिला तर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही, मी राजकारण सोडतो, आणि मागणीप्रमाणे जर शेट्टी कृती करू शकले नाहीत तर त्यांनी निवडणूक लढवू नये,असे जाहीर आव्हान माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिले.’ऊस तोडायला कोण आडवा आला तर आम्ही त्याच्या आडवे येऊ,असे सदाभाऊंनी नाव न घेता शेट्टींना इशारा दिला आहे.
खोत म्हणाले,‘यावर्षी उसाचे क्षेत्र घटल्याने साखरेचे उत्पादनही घटणार आहे. हंगाम लांबल्याने शेतकरी आणि कारखानदार यांचेही नुकसान होणार आहे.ऊस कर्नाटकात जाण्याचीही भिती आहे. यासाठी कारखानदारांनी गत हंगामातील फरक २०० रुपये आणि चालू हंगामात पहिला हप्ता ३२५० रुपये देण्यासाठी पुढे यावे. या मागणीसाठी रामचंद्र डांगे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली असून लवकरच ही समिती कारखानदारांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. केवळ लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा चळवळीत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करण्याची आवश्यकता आहे.स्वत:च्या राजकारणासाठी कोणीतरी शेतकरी चळवळीचा चुकीचा उपयोग करीत असेल,शेतकऱ्यांचे नुकसान करीत असेल तर ते चालू देणार नाही.तसेच आता लोक जागे झाले आहेत. त्यामुळे कारखानदारांनीही याचे भान ठेवून कारखाने चालवावेत,अन्यथा सहकारी साखर कारखाने कधीकाळी होते, असे म्हणण्याची वेळ येईल.’
शेतकरी संघटनेच्या आंदोलनावर सदाभाऊ म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या नेत्यांनी उसाला यंदाचा 3500 दर मिळवून द्यावा, तर गतवर्षीचा 400 रुपये मिळवून दिले तर मी राजकीय संन्यास घेईन. त्यांनी हा दर दिला नाही तर त्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. यापुढे त्यांनी कोणतीही निवडणूक लढवू नये,’ असे आवाहनही केले आहे.
स्वाभिमानीच्या मागणीला विरोध करत खोत यांनी सांगितले, ‘रयत क्रांती संघटनेच्या वतीने समिती स्थापन करून उसाला पहिली उचल 3250 द्यावी, तर गतवर्षीचा 200 रुपये फरक द्यावा, ही मागणी आपण करणार आहे. कारखानदारांनी यावर लवकर बैठक बोलावून निर्णय घ्यावा. कारखानदारांनी आमची मागणी मान्य केल्यास, आम्ही कारखानदारांच्या पाठीशी राहू. ऊस तोडायला कोण आडवे येत असेल, तर त्यांच्या आडवे आम्ही जाऊ,’ अशा शब्दांत खोत यांनी शेट्टींना सुनावले.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक या नात्याने सदाभाऊ खोत यांनी यावर्षीच्या ऊसाला ३,२५० रुपये मिळाल्यास कारखाने सुरू करण्यास मदत करणार असल्याचेही जाहीर करत एका परीने शेट्टी यांना आव्हान दिले.या आंदोलनात मराठा महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक सुरेश दादा पाटील व कुरुंदवाडचे भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांचा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.