Last Updated on 28 Aug 2024 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
हिंगोली । हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यातील आडगावामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. तरुणाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.संतोष पवार असे हत्या झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
वसमत तालुक्यातील आडगाव (रंजे.) येथे बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तलाठी संतोष पवार (वय ३६) हे सज्जा कार्यालयात काम करत बसले होते. येथे बोरी सांवत येथील एकजण त्यांच्याकडे प्रलंबित शेतीच्या कामासाठी आले होते. तलाठी व त्यांच्यात बाचाबाची झाली. यात तलाठी पवार यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकत त्यांच्यावर धारधार चाकूने वार केले. तलाठी कार्यालयात काय प्रकार घडला हे कळताच नागरिकांनी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तलाठी संतोष पवार यांना उपचारासाठी परभणीकडे हलविण्यात येत होते. परंतु, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलिस अधिकारी मारोती थोरात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी भेट दिली. दरम्यान, एका हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.












































































