Last Updated on 13 Jul 2020 4:04 PM by
डिजिटल भारतासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार: सुंदर पिचाई
दिल्ली : भारतीय डिजिटायझेशन फंडमध्ये गुगल जवळपास ७५ हजार कोटी रुपये म्हणजेच १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. गुगल इंडियाचा वार्षिक कार्यक्रम ऑनलाइन पार पडला.यावेळी बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी घोषणा केली की,पुढच्या ५-७ वर्षात गुगलकडून भारतात विविध क्षेत्रात १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल.विशेष म्हणजे सोमवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचई यांची व्हर्च्युअल बैठक झाली होती.गुगलकडून करण्यात येणारी गुंतवणूक ऑपरेशन्स व डिजिटल क्षेत्रातील पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित असणार आहे असेही पिचई यांनी म्हटले आहे.
गुगल कंपनीच्या इंडिया डिजिटायझेशन फंड अंतर्गत ही ७५ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.या गुंतवणुकीत प्रत्यक्ष भागीदारी, समभागांद्वारे गुंतवणूक आणि आधुनिक संसाधनांची निर्मिती याचा समावेश असेल.अशी माहिती पिचाई यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये दिली आहे.
ही गुंतवणूक करताना गुगल प्रत्येक भारतीयाला त्यांच्या मातृभाषेत सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देणार आहे.तसेच,भारतीयांच्या सामान्य गरजा लक्षात घेता त्यांना गरज पडेल अशी डिजिटल उत्पादनांची निर्मिती करण्यावरही गुगल भर देणार आहे.
तर,उद्योग,व्यवसायांना आधार देण्याचे काम आणि आरोग्य,शेती,शिक्षण यांसारख्या क्षेत्रांमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा भर देखील गुगलतर्फे दिला जाणार आहे.
प्रत्येक भारतीयाला त्याच्या मातृभाषेत तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल काम करणार आहे.हिंदी,मराठी,तमिळ,पंजाबी अशा सर्व भाषांमध्ये गुगलकडून तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जाईल.भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने आणि सेवा गुगलकडून तयार केले जातील. डिजिटल बदलावर भर असल्याने यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रातील सामाजिक कामांसाठी तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा वापर केला जाईल.
आज भारतामधील सोयी सुविधांचा दर्जा वाढवण्यासाठी डिजीटलायझेशन फंडची घोषणा करताना मला आनंद होत आहे.आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून पुढील पाच ते सात वर्षांमध्ये भारतात ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत.आम्ही इक्विटीच्या माध्यमातून, भागीदारीमधून तसेच ऑप्रेशनल क्षेत्रामधून गुंतवणूक करणार आहोत.याचप्रमाणे डिजीटलायझेशनसंदर्भातील बांधकाम आणि इकोसिस्टीम (व्यवस्था) निर्माण करण्यासाठी गुंतवणूक करण्यात येईल.आम्हाला भारताच्या भविष्यावर आणि त्याच्या डिजीटल अर्थव्यवस्थेवर विश्वास आहे हेच या गुंतवणूकीमधून दिसून येत आहे,असे पिचई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.
आम्ही आज गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत १० बिलीयन डॉलरच्या (७५ हजार कोटी) गुंतवणूकीची घोषणा केली.भारताच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत.आम्हाला यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजीटल इंडियाच्या व्हिजनमुळे पाठिंबा मिळाला.त्यासाठी त्यांचे धन्यवाद. त्याचप्रमाणे मंत्री रवीशंकर प्रसाद आणि मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांचेही आभार,अ ट्विट पिचई यांनी केले आहे.
दरम्यान,या गुंतवणुकीमुळे भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेला गती मिळेल असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.














































































