Last Updated on 14 Aug 2022 6:40 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही घटना घडली आहे. माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता.अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती.यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्डची प्रकृती गंभीर होती.दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचे निधन झाले असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
या दुर्दैवी घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे.
कोण होते विनायक मेटे
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य
सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन अत्यंत धक्कादायक आणि वेदना देणारे आहे. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनायक मेटे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मी आजच मुंबई येथे बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मेटे उपस्थित राहणार होते. या बैठकीपूर्वीच काळाने त्यांना आपल्यातून हिरावून नेले. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते तळमळीने बोलायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. या धक्क्यातून सावरण्याचे बळ मेटे कुटुंबियांना मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.












































































