Last Updated on 23 Sep 2024 1:12 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कारंदवाडीत विविध विकासकामांचे लोकार्पण, उदघाटन
इस्लामपूर । येथील विद्यमान आमदार अनेक वर्षे मंत्री होते. मोठं मोठी खाती त्यांच्याकडे होती. परंतु त्यांना त्याचा वापर करून मतदार संघाचा विकास साधता आला नाही. आशा या अकार्यक्षम लोकप्रतिनिधीला तुम्ही ३५ वर्षे सोसलं आहे. परंतु आता बदल घडवण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला तुम्ही आशीर्वाद द्या. मी तुम्हाला शब्द देतो की, महायुती सरकारच्या माध्यमातून इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गाव राळेगणसिद्धी व पाटोदासारखे रोडमॉडेल करून दाखवीन असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केला.
कारंदवाडी (ता.वाळवा) येथे महायुती सरकारच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेल्या व नव्याने सुरू होणाऱ्या रु. ३ कोटी ७५ लाख ३० हजार रुपयांच्या विविध विकास कामांच्या लोकार्पण व उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. भाजपा प्रदेश सदस्य प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील मोरे, तालुकाध्यक्ष निवास पाटील, भाजपा महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुरेखाताई जगताप, उपसरपंच रुपाली सावंत यांची प्रमुख उपस्थितीत होती.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, गेल्या ५५ वर्षांपासून एकाच घरात सत्ता आहे. परंतु या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. पाणंद रस्त्यांसह अन्य प्रश्न प्रलंबित आहेत. कारंदवाडी परिसरातील शेतकरी प्रगतशील आहे. ते एकरी १०० टनाच्या वर उत्पन्न घेतात, ही अभिमानाची बाब आहे. परंतु येथील लोकप्रतिनिधीनी या शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळावा, यासाठी ठोस उपाययोजना जाणीवपुर्वक केल्या नाहीत. तसेच मतदार संघातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी पाऊले उचलली नाहीत. ही या मतदार संघातील जनतेची व युवकांची शोकांतिका आहे. कारंदवाडीत गावामध्ये गेल्या दहा महिन्यात रु.३ कोटी ७५ लाख ३० हजार रुपयांचा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून आला आहे. यातून प्रलंबित सर्व कामे मार्गी लागली आहेत.
ते म्हणाले, गेल्या ३५ वर्षांपासून कारंदवाडीसारखे निम्मे गाव उजेडात आणि निम्मे गाव अंधारात ठेवणारी मानसिकता असणाऱ्या विद्यमान आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत घरी बसवण्यासाठी येथील सुज्ञ मतदारांनी पुढाकार घ्यावा.
प्रसाद पाटील म्हणाले, निशिकांतदादांनी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावात विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. त्यातून अनेक वर्षे प्रलंबित असणारी गावातील अंतर्गत रस्ते, पाणंद रस्ते, काँक्रीटीकरण, मुरमीकरण, आरसीसी गटर, मुरुमीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, आदी कामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनतेसमोर कोणत्या तोंडाने मते मागायला जायचे, असा प्रश्न आ.जयंत पाटील यांच्यासमोर असल्याने ते काही ठिकाणी आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचेही श्रेय लाटत आहेत.
उपसरपंच सौ रूपाली सावंत म्हणाल्या, कारंदवाडी ग्रामपंचायतीमध्ये भाजपा व जनशक्ती परिवर्तन पॅनेलने सत्तांतर घडविल्यानंतर अवघ्या १० महिन्यात पालकमंत्री ना. डॉ. सुरेश खाडे, खा. धैर्यशिल माने व भाजपा जिल्ह्याध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या विशेष प्रयत्नातून व शासनाच्या विविध योजनेतून ३ कोटी ७५ लाख ३० हजार रुपयांची विकास कामे पूर्णत्वास गेली आहेत. येथील जनतेला आम्ही दिलेल्या आश्वासची वचनपूर्ती करण्यात आम्हाला यश आले आहे. गावाला रोड मॉडेल बनवायचे असेल तर आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निशिकांतदादांच्या पाठीशी उभे राहावे.
धैर्यशील मोरे म्हणाले, विद्यमान आमदारांना गेल्या अनेक वर्षात मतदार संघाचा विकास साधता आला नाही. शेतकऱ्यांच्या ऊसा भाव देण्यासाठी या आमदारांचा पुढाकार असायला हवा मात्र ऊस दराची कोंडी फुटु नये याची पध्दतशीर काळजी हे आमदार घेतात,शेतकर्यांची अर्थिक कोंडी करणाऱ्या या आमदारांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत धूळ चारण्यासाठी आपण निशिकांतदादा यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे.
निवास पाटील म्हणाले, गेली ३५ वर्षे इस्लामपूर मतदार संघात मी मालक व येथील जनता गडी अशी वागणूक येथील विद्यमान आमदार जयंत पाटील यांनी येथील मतदाराला दिली आहे. त्यांच्या या भूमिकेला ब्रेक लावण्याचे काम निशिकांतदादांनी केले आहे. निशिकांतदादांच्या प्रयत्नातून या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे. त्यातून अनेक कामे मार्गी पूर्ण झाली आहेत.
जनशक्ती पॅनेलचे प्रमुख विकास हाके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, संदिप सावंत यांनी देखील मनोगत व्यक्त केले,यावेळी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, तालुकाध्यक्ष प्रवीण माने, ओ.बी.सी. मोर्चा तालुकाध्यक्ष मधुकर हुबाले, तालुका उपाध्यक्ष प्रा.दत्तात्रय पाटील, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, ग्रामपंचायत सदस्य सचिन लोंढे, पोपट हाके, संभाजी हाके, शामरावदाजी कामिरे, विजय हाके, ग्रा.पं. सदस्या अर्चना सरदेशमुख, इंदुमती खामगळ, सुजाता खोत, मधुमती कांबळे, अरुणा हजारे, ग्रामसेविका ज्योती शामराव मोहोटकर, भाजपा कार्यकारणी सदस्य अनिलभाऊ सरदेशमुख, सचिन सावंत, दिगंबर ठाणेकर, रुबाब मुलाणी, महादेव हाके, नितीन रसाळ, संदीप कोकरे अप्पा सनदे,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









































































