Last Updated on 05 May 2024 8:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । देशभरात लोकसभेच्या निवडणूकांनी राजकारण तापले आहे. लोकसभा 2024 च्या निवडणूकीच्या तिसरा टप्प्यासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात मतदान होणार आहे.तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघांत मतदान होणार आहे.
तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या दिग्गज नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, प्रल्हाद जोशी, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव, पिपल्स डेमाॅक्रॅटीक पार्टी-पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती आदी नशीब आजमाविणार आहेत.
7 मे रोजी लोकसभा 2024 च्या निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मतदानात एकूण 1,351 उमेदवार नशिब आजमाविणार आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी गुजरात राज्यातून 26 लोकसभा मतदार संघातून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज आले. तर त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. या टप्प्यात 10 राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या 93जागांसाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या 10 कर्नाटकच्या 14, महाराष्ट्रातल्या 11, मध्यप्रदेश 9, छत्तीसगड 7, बिहारच्या 5, तर आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये प्रत्येकी 4 जागांवर, तर गोवा, दादरा नगर हवेली आणि दीव-दमण मध्ये प्रत्येकी 2 जागांवर मतदान होणार आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी आज इंदापूर इथं जाहीर सभा घेत प्रचाराची सांगता केली. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये जाहीर सभा घेऊन प्रचाराची सांगता केली.
महत्वपूर्ण लढती अशा :
रायगड – अनंत गीते (ठाकरे) विरुद्ध सुनील तटकरे (अजित पवार), बारामती – सुप्रिया सुळे (शरद पवार) विरुद्ध सुनेत्रा पवार (राष्ट्रवादी अजित पवार), धाराशीव – ओमराजे निंबाळकर (ठाकरे) विरुद्ध अर्चना पाटील (राष्ट्रवादी अजित पवार), लातूर – शिवाजी काळगे (कॉंग्रेस) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे (भाजपा), सोलापूर – प्रणिती शिंदे (कॉंग्रेस) विरुद्ध राम सातपुते (भाजपा), माढा –रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजपा) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील (शरद पवार), सांगली – संजयकाका पाटील (भाजपा) – चंद्राहार पाटील (ठाकरे) – विशाल पाटील (अपक्ष), रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत ठाकरे) विरुद्ध नारायण राणे (भाजपा), कोल्हापूर – शाहु महाराज (कॉंग्रेस) विरुद्ध संजय मंडलिक (भाजपा), हातकणंगले – धैर्यशील माने (शिंदे) – राजू शेट्टी (स्वाभीमानी पक्ष) – सत्यजित पाटील सरुडकर (ठाकरे)










































































