Last Updated on 21 Aug 2024 11:14 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा
बीड | लाडकी बहीण व लाडका भाऊ नंतर आता आपला अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याच्या लाभाच्या सर्व योजना राबवून लाडका शेतकरी अभियान राज्यात सुरु करण्यासोबतच सोयाबीन व कापसाला हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्यातील ई पिक पाहणीची अट रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परळी वैजनाथ येथील राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी केली.
परळी येथील स्व. पंडीतअण्णा मुंडे सभामंडप कृषि उत्पन्न बाजार समिती येथे एका दिमाखदार सोहळ्यात पाच दिवसीय कृषि महोत्सव २०२४ चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास केंद्रीय कृषि व शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमास व्यासपीठावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, राज्य कृषि मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल तसेच विधानपरिषद सदस्या आमदार पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रिमोटद्वारे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. तसेच सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अनुदान वितरीत करण्यासाठी वेबपोर्टलही मान्यवरांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आले. कृषि विभागाच्या विविध योजनांच्या माहितीचा समावेश असलेल्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले. यासोबतच परभणी येथील वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाने तयार केलेल्या एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन पुस्तिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.
पाच दिवसीय या कृषि महोत्सवात कृषि साहित्य प्रदर्शनासोबतच पशुप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत येणाऱ्या पाच दिवसात विविध विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र होणार आहे. तसेच याठिकाणी धान्य महोत्सव, रानभाजी महोत्सव होणार आहे. प्रदर्शनात महिला बचतगटांसाठी साहित्य विक्रीची दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कृषि अवजारांचा स्वतंत्र विभाग देखील याठिकाणी आहे. या पाच दिवसीय महोत्सवाला किमान पाच लाख शेतकरी भेट देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणारे असून आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीच्या काळात हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे. एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला. गतवर्षी सोयाबीन, कापूस पिकाला कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासाठी आवश्यक ई-पीक पाहणी अहवाल अनेक शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले असल्याने आता ई-पीक पाहणी अहवालाची अट शिथिल करून सातबारा उताऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच लाडक्या भावांना विद्यावेतन देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. आता याच धर्तीवर विविध लाभांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लाडका शेतकरी अभियान सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. याची सुरुवात आज नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून होत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना केवळ १ रुपया विमा हप्ता भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषिपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ‘कष्टकरी, वारकरी आणि सुखी शेतकरी’ हेच शासनाचे धोरण असून राज्यातील कांदा, सोयाबीन, कापूस आणि दुधाला योग्य मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या सक्षमीकरणामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच कृषि क्षेत्रातील नवीन बदलांची माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी, आधुनिक शेतीला चालना मिळून राज्यातील कृषि क्षेत्राचा विकास होण्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास व्यासपीठावर आमदार विक्रम काळे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार नमिता मुंदडा, आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार टी.आर. जिजा पाटील, माजी आमदार सुरेश धस, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी आभार मानले.










































































