Last Updated on 01 May 2023 3:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील 317 तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली.यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.यात सुमारे 30 चाचण्या मोफत करण्यात येतील.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला.या योजनेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिजीटल अनावरण करण्यात आले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस नागपूर येथून,आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत उस्मानाबाद येथून तर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील,शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी त्या-त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणांहून लोकप्रतिनिधी,खासदार, आमदार आदी मान्यवरांसमवेत दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले.वर्षा शासकीय निवासस्थानी सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव नवीन सोना,आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.
गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरुवात केली होती.त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे.आज मुंबईमध्ये सुमारे 250 आपला दवाखाना कार्यरत आहेत.त्याचा लाभ लाखो रुग्णांना होत आहे.आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत.वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आपण या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती.त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षामार्फत 6 हजार 200 रुग्णांना एकूण 52 कोटी रुपयांहून अधिकची मदत केली आहे.महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत,प्रधानमंत्री जनआरोग्य योजना या एकत्रित योजनेअंतर्गत लाखो रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला आहे.
या दवाखान्याच्या माध्यमातून 30 सेवा, औषध आणि वैद्यकीय सल्ला देखील मोफत मिळणार आहे. सामान्य माणसांच्या आरोग्याची काळजी घेणार हा उपक्रम आहे.याची अर्थसंकल्पातच या संकल्पनेसाठी तरतूद केली होती.यात 500 दवाखाने सुरु करण्यात येणार आहेत.त्यातील आज 317 दवाखाने सुरु होत आहेत.महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत उपचारांची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवली आहे.यात आता 900 शस्त्रक्रिया मोफत करता येतात. पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांचे पर्यंतचे उपचार होतात.अशा रितीने राज्यातील सुमारे ८ कोटी लोकांना आता मोफत उपचार मिळू लागले आहेत.सामान्य माणसांला आरोग्य सेवा, उपचाराचा बोजा उचलावा लागू नये अशी ही तरतूद आहे.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित यात सुमारे 4 लाख 39 महिलांची तपासणी पूर्ण केली असून,त्यांच्यावर 70 टक्के उपचार देखील पूर्ण केले आहेत.सदृढ बालक योजनेचीही यशस्वी अमंलबजावणी सुरु आहे. मेळघाटातील कुपोषण मुक्ती याबाबत प्रभावीपणे काम करत आहोत.औषध प्राधिकरणाची निर्मिती, जनआरोग्य योजना तसेच आरोग्य विभागात पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर दिला जात आहे.









































































