Last Updated on 24 Feb 2023 7:10 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची पत्रकार परिषदेत माहिती
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांची प्रमुख उपस्थिती, सावरकरभक्त करणार स्वातंत्र्यवीरांस अभिवादन
मुंबई |स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार,जीवनकार्य जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी देशातील पहिले ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ राज्यात सुरु करण्यात येणार आहे. तसेच, नाशिक येथील भगूर या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी भव्य सावरकर थीम पार्क आणि संग्रहालयदेखील उभारण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी स्वा.सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त भगूर येथे भव्य अभिवादन पदयात्रा व कार्यक्रमात सावरकरप्रेमी नागरिक, कार्यकर्ते, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
भगूरमधील ‘सावरकर वाडा’ येथे पर्यटन विभागामार्फत आयोजित मुख्य कार्यक्रमात पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था-संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. ‘स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त दि. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता भगूरमधील नूतन विद्यालय ते सावरकर वाडा अशी भव्य अभिवादन पदयात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी ९ ते १०:३० दरम्यान सावरकर वाडा येथील मुख्य कार्यक्रमात गायक चारुदत्त दीक्षित व सहकलाकारांचे स्वा. सावरकर लिखित गीतांचे गायन, योगेश सोमण लिखित-दिग्दर्शित अभिवाचन, मान्यवरांचे सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत.
थीम पार्क
भगूर येथे निर्माणधीन ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे. त्यामुळे भगूर, नाशिक शहर, जिल्ह्यासह विविध ठिकाणांहून अधिकाधिक सावरकरभक्त नागरिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग तसेच अन्य सहयोगी संस्था-संघटनांच्यावतीने करण्यात आले आहे.
पर्यटन सर्किटमध्ये काय काय?
- भगूरमधील या कार्यक्रमात पर्यटन विभागाच्या माध्यमातून देशातील पहिल्या ‘वीर सावरकर पर्यटन सर्कीट’ची घोषणा करण्यात येणार आहे. या पर्यटन सर्किट मध्ये सावकर यांचे जन्मस्थान भगूर वाडा आणि अष्टभूजा देवी मंदिर, अभिनव भारत मंदिर तिळभांडेश्वर गल्ली,नाशिक, पुणे येथील सावरकर अध्यासन केंद्र,डेक्कन, पहिली विदेशी कपड्यांची होळी, पतितपावन मंदिर रत्नागिरी येथील, शिरगाव रत्नागिरी येथे सावरकर काही काळ वास्तव्यास होते ती खोली मालक आणि सावरकराचे सहकारी दामले यांनी तशीच ठेवली आहे तसेच डॉ. हेडगेवार आणि सावरकर यांची पहिली भेट झाली, गुरव समाजाचे मारूती मंदिर, विठ्ठल मंदिर, सावरकारांनी सुरू केलेली कन्या शाळा, सावरकर सदन, सावरकर स्मारक दादर,बाबाराव सावरकर स्मारक सांगली या ठिकाणांचा पर्यटन सर्किट मध्ये समावेश आहे.
- तसेच भगूर येथे बनत असलेले ‘थीम पार्क’ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरित करून स्वा. सावरकरांच्या विचार-दर्शनावर आधारित भव्य थीम पार्क व संग्रहालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पांबाबत पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
- राष्ट्रासाठी असीम त्याग व समर्पण करणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना, त्यांच्या विचार व कार्याला या भव्य पदयात्रा व कार्यक्रमाच्या निमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे.










































































