Last Updated on 16 Jun 2025 8:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | १८ दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.
1 ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 1 टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटरहून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.
22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.
अद्याप ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री आणि कोदवळी या नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नदी पात्रातील नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यात रस्ते अपघातात तीन व्यक्तींचा मृत्यू तर सात व्यक्ती जखमी झाल्या असून नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात वीज पडून दोन तर जालना जिल्ह्यात तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात वीज पडून तीन व्यक्तींचा मृत्यू व एक व्यक्ती जखमी झाली आहे तर भिंत पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ठाणे जिल्ह्यात दरीत पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर आगीच्या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली आहे. रायगड जिल्ह्यात पाण्यात बुडून तीन व्यक्तींचा मृत्यू, मुंबई उपनगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती जखमी, बुलढाणा जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू आणि चार व्यक्ती जखमी तर धुळे जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती जखमी झाला आहे. पुणे येथील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शेजारी कुंडमळा (इंदुरी) येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल दुर्घटनेत चार व्यक्तींचा मृत्यू आणि ५१ व्यक्ती जखमी झाल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
रायगड जिल्ह्यास पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार २४ तासाकरिता रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये (१६ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ११२.७ मिमी पाऊस झाला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११०.७ मिमी, मुंबई शहर १००.४ मिमी, मुंबई उपनगर ८६ मिमी, रायगड ७२.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.










































































