Last Updated on 14 Jan 2023 8:22 PM by Sanjay Patil/Adhorekhit
चीफ इंजिनिअर विजय मोरे यांना उत्कृष्ठ चीफ इंजिनिअर; तर अजित पाटील यांना ऊस भूषण पुरस्कार जाहीर

सांगली । साखर उद्योगातील शिखर संस्था मानले जाणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही एसआय) च्या वतीने राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आर.डी.माहुली यांना उत्कृष्ठ कार्यकारी संचालक,चीफ इंजिनिअर विजय मधुकर मोरे यांना उत्कृष्ठ चीफ इंजिनिअर, तर कारखान्याचे कापुसखेड (ता.वाळवा) येथील युवा ऊस उत्पादक शेतकरी अजित आनंदराव पाटील यांना ऊस भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुणे (मांजरी बु:) येथी ल व्हीएसआयच्या मुख्यालयात २१ जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, सहकार मंत्री ना.अतुल सावे यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय नेते,व्हीएसआयचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखालील शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.
कारखान्याचे मार्गदर्शक,माजी मंत्री आ.जयंतराव पाटील,कारखान्याचे अध्यक्ष,राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील,उपाध्यक्ष विजयराव पाटील,कामगार नेते शंकरराव भोसले,तानाजी खराडे,राजेंद्र चव्हाण,जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,सेवा निवृत्त सचिव प्रताप पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक,सभासद,अधिकारी व कामगारांच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
श्री.आर.डी.माहुली हे २००५ पासून राजारामबापू साखर कारखान्याच्या सेवेत आहेत.प्रथम १० वर्षे सचिव,फायनान्स मॅनेंजर,तर गेल्या ७ वर्षापासून कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी पहात आहेत. विजय मोरे हे १९९८ पासून राजारामबापू साखर कारखान्याच्या सेवेत असून त्यातील १५ वर्षे ते चीफ इंजिनिअर पदाची जबाबदारी पहात आहेत.या दोन्ही अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या वाटचालीत मोलाचे योगदान केलेले आहे.
अजित पाटील हे ३७ वर्षीय युवा शेतकरी असून ते गेल्या १० वर्षापासून ऊस शेती करीत आहेत.त्यांनी २५ गुंठ्यांत को ८६०३२ या जातीच्या ऊसाच्या खोडवा पिकाचे ६७ टन ६०२ किलो इतके उत्पादन घेतलेले आहे.त्यांनी ऊस विकास अधिकारी सुजय पाटील, शेती विभाग व कारखाना व्यवस्थापनाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार मानले.







































































