Last Updated on 05 Nov 2023 6:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
अध्यक्ष नेताजी पाटील यांची घोषणा : संघाची गत वर्षी 640 कोटींची उलाढाल
सांगली । राजारामबापू पाटील दूध संघाने दूध उत्पादकांना म्हशीच्या दुधास प्रतिलिटर 2 रुपये 20 पैसे,गायीच्या दुधास प्रतिलिटर 1 रुपया दूध दर फरक,तर दूध संघातील कर्मचाऱ्यांना 18 टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष नेताजी पाटील यांनी केली.
पाटील म्हणाले,संघास दूध पुरवठा करणाऱ्या सेंटर धारकांच्या दूध उत्पादकांना सुद्धा म्हशीच्या दुधास प्रतिलिटर 2 रुपये 10 पैसे,तर गाईच्या दुधास प्रतिलिटर 90 पैसे दूध दर फरक विनाकपात देणार आहे.हा फरक दूधसंस्था सेंटरच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्यात येणार आहे.दूध संघाने माजी मंत्री आ. जयंत पाटील,राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली नेत्रदिपक प्रगती केलेली आहे.
प्रतिदिन 2 लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे.संघ दूध विक्रीसह शिल्लक दुधाची पावडर किंवा पदार्थ निर्मिती करीत आहे.
दूध उत्पादक सभासदांच्या फायद्यासाठी संघाने विविध योजना राबवल्या आहेत.आपल्या भागात म्हशींची संख्या वाढवण्यासाठी गुजरातहून खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याला बिनव्याजी रक्कम संघामार्फत दिली जाते.यासह रेडी,पाडी अनुदान 30 हजार रुपये दिले जाते.तर गाय कालवड अनुदान 7 हजार 500 रुपये दिले जाते.रेडी,पाडी यांचे योग्य संगोपन करण्यासाठी 2 हजार 250 रुपयांचे अनुदान दिले जाते.10 म्हशी किंवा गायींच्या गोठ्यासाठी अर्थ पुरवठा केला जातो.मुक्तसंचार गोठ्यासाठी प्रति जनावर 3 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.चारा बियाणे खरेदीवर 35 टक्के अनुदान दिले जात आहे.दूध संघात निर्माण होणाऱ्या पशुखाद्याचीही विक्री वाढली आहे.संघाने गत वर्षी 640 कोटींची उलाढाल केलेली आहे.
दूध उत्पादकांची दिपावली गोड व्हावी तसेच म्हणून संघाने दूध दर फरक प्राथमिक दूध संस्थाकरीता विकास व्याज दूधाचे ठेव व विकास ठेवीवरील लाभांश व डिपॉझिट आणि दसवडा बिल व कर्मचारी बोनस अशी एकुण रक्कम 17 कोटी रूपये खातेवर वर्ग करणेत येणार असलेचे त्यांनी सांगितले.
दसरा सणानिमित्त संघाचे सभासदांना 5714 किलो श्रीखंड भेट देण्यात आले असून दिपावलीनिमित्त सभासदांना 5250 किलो तूप भेट देण्यात येणार आहे. सभासदांना भेट देण्यात येणा-या दुग्ध पदार्थाची एकुण रक्कम 50 लाख रूपयेपर्यंत असल्याची माहीती संघाचे व्हा.चेअरमन शशिकांत पाटील यांनी दिली.
यावेळी संचालक पोपटराव जगताप,जगन्नाथ पाटील,संजय शिंदे,सहायक सरव्यवस्थापक पी. डी. साळुंखे,कार्यालयीन अधीक्षक लालासाहेब साळुंखे,दूध संकलन व्यवस्थापक आर.एस.पाटील उपस्थित होते.












































































