Last Updated on 03 May 2023 3:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई । राज्यातील रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्याकरता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
राज्यात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत.मुंबईत 400 किमीच्या रस्त्यांचे काम सुरू आहे.तर, अनेक ठिकाणीही कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांवर देखरेख ठेवण्याकरता महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होण्यास मदत होणार आहे.त्यामुळे या महाडमंळाच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या महामंडळाचे भागभांडवल 100 कोटी रुपये राहणार असून,51 टक्क्यांचा शासन हिस्सा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.रस्ते व इमारती विकास व देखभाल पूरक निधीची देखील उभारणी येईल.राज्यातील 3 लाख किमी इतक्या लांबीच्या रस्त्यांपैकी 1 लाख किमीचे प्रमुख राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत.या रस्त्यांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती करावी लागते.अवजड वाहनाच्या रहदारीमुळे रस्ते खराब होतात. त्यामुळे या महामंडळाची स्थापन करण्यात येत आहे.
महत्वपूर्ण निर्णय असे
👉 कांदळवन व सागरी जैवविविधता या विषयात परदेशात उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ मुलामुलींना शिष्यवृत्ती.
👉 महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्थापन करणार. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेगाने होणार.
👉 घनकचरा संकलनासाठी आयसीटी आधारित प्रकल्प सर्व शहरांमध्ये राबविणार.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य.
👉 शिरोळ (जि. कोल्हापूर) तालुक्यात ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय.
👉 करमणूक शुल्क आकारणीमध्ये सुट देण्याचा निर्णय












































































