Last Updated on 02 Dec 2024 10:58 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नांदेड । शेतकऱ्यांना कोणत्याही लाभासाठी यापुढे ई – पीक पाहणी प्रक्रीया पूर्ण करणे आवश्यक होणार आहे. त्यामुळे भविष्यातील सर्व लाभ मिळण्यासाठी ही प्रक्रीया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण राज्यात रब्बी हंगाम २०२४ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल ॲप द्वारे पीक नोंदणी करावयाची आहे. दिनांक १ डिसेंबर २०२४ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये रब्बी हंगाम २०२४ सुरू करण्यात येत आहे.
या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरुन मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद करण्यात येणार आहे. तद् अनुषंगाने रब्बी हंगाम २०२४ करिता शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी दि.१ डिसेंबर २०२४ ते १५ जानेवारी २०२५ हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. त्याकरिता ई-पीक पाहणी (DCS) V 3.0.3 डाऊनलोड करावे.
तसेच डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मध्ये गटाच्या हद्दीवर आधारित Geo Fencing बंधनकारक करण्यात आलेली आहे म्हणजेच जोपर्यंत संबधित खातेदार निवडलेल्या गटात जाऊन पीक पाहणी करत नाही तो पर्यंत पिकांचे छायाचित्र काढता येत नाही व पीक पाहणी upload करता येत नाही. तरी जिल्हयातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी रब्बी हंगाम २०२४ साठी ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही.
सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध
राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शासनाकडून उपलब्ध करून दिलं आहे. भविष्यात संपूर्ण राज्यात पीक पाहणी ही पूर्णपणे सुधारित ‘ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप’द्वारे होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली पीक पाहणी या ॲपद्वारे ठराविक मुदतीत करून घ्यावी, जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. यापुढे पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी सहायकाची नेमणूक केली जात आहे. प्रत्येक गावासाठी सहायक उपलब्ध राहणार असून सहायकामार्फत पीक नोंदणी होणार आहे. पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणं आवश्यक आहे.










































































