Last Updated on 14 Mar 2024 8:56 PM by Sanjay Patil/Adhorekhit
वडगाव हवेली येथे यशवंतराव चव्हाण जयंती सोहळा उत्साहात
सातारा । यशवंतराव चव्हाण यांच्या वाटचालीत ग्रामीण संस्कृती केंद्रस्थानी होती. प्रत्येकाची जडणघडण ग्रामीण संस्कृतीतून होते, यावर ते ठाम होते. म्हणूनच त्यांनी सहकार चळवळ आणि लोकशाहीच्या विकेंद्रीकरणातून अनेक निष्ठावान अनुयायी घडवले,असे प्रतिपादन प्रा. संजय थोरात यांनी व्यक्त केले.
कराड तालुक्यातील वडगाव हवेली येथील स्व. यशवंतराव चव्हाण युवक मंडळ, वडगाव हवेली, ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, सिद्धेश्वर दूध संस्था व पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जयंती सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणू ते बोलत होते अध्यक्षस्थानी ह.भ.प. निवृत्ती साळुंखे होते.
यावेळी माजी आ. आनंदराव पाटील,कृष्णा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले,यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदिश जगताप, संचालक दयानंद पाटील, ज्ञानदेव भंडारे, माजी संचालक माणिकराव जाधव, बाळासाहेब जगताप, शिवराज चव्हाण, सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच सचिन चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रा. थोरात म्हणाले,यशवंतराव चव्हाण यांनी बेरजेच्या राजकारणाची यशवंत निती रुजवली.प्रचंड वाचन आणि ग्रामीण संस्कृतीच्या अनुभवांनी त्यांना शिकवले.संवादशील व जनसंवाद करणारे ते नेते होते.तसेच राजकारणी,वक्ते म्हणूनही थोर होते.त्यांनी संस्थात्मक लोकजीवन मजबूत केले व सुसंस्कृत राजकारण जपले.
जगदिश जगताप म्हणाले,१९८५ पासून वडगाव हवेलीत चव्हाण साहेबांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन केले जात आहे.चव्हाण साहेबांनी या भागाचा कायापालट केला.त्यांच्या कार्याचे वाचन करून नव्या पिढीला त्यांचे कार्य ज्ञात व्हावे, मुलांना प्रेरणा मिळावी.याकरिता जयंती सोहळ्यात व्याख्यान घेतले जाते. त्यांचे विचार आणि आजच्या राजकारणाची दिशा बघितली,तर त्यांच्या नावाशिवाय राजकारण पूर्ण होत नाही.
यावेळी माजी आ. आनंदराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य भेट दिलेल्या रणधीर शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच राजेंद्र जगताप, उपसरपंच सचिन चव्हाण, तानाजी जगताप,गोरख जगताप,सत्यवान जगताप, माणिकराव जगताप व पदाधिकऱ्यांनी स्वागत केले.अशोक जगताप व श्रीरंग साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. तर मोहनराव जगताप यांनी आभार मानले.









































































