Last Updated on 12 Oct 2022 12:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
जिल्हा प्रशासनाने घेतली दखल: त्या चिमुकल्याच्या मदतीसाठी आले पुढे
हिंगोली । मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी आता अनुदानाची वाट पाहत असल्याचे दिसत आहे.मात्र,अद्यापपर्यंत कोणालाही अनुदान मिळाले नसल्याने मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील एका चिमुकल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहिले असून,चिमुकल्याने लिहिलेल्या या पत्राची जोरदार चर्चा सुरु असून,हे पत्र सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दरम्यान, आता जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत अधिकारी त्या चिमुकल्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधल्या गोरेगाव येथील प्रताप जगन कावरखे या इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या चिमुकल्याने अतिवृष्टी अनुदानाची रक्कम लवकर मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले होते. यात त्याने सायेब, पैसे लवकर द्या, मग आई पुरणपोळ्या करेल, तुम्ही बी खायला या…’ अशी आर्त हाक दिली आहे.
यामध्ये त्याने म्हटले आहे की, “मुख्यमंत्री साहेब,आम्हाला सणाला पुरणपोळ्या मिळाल्या नाहीत.बाबा मला पाणीपुरी खायला दहा रूपये देखील देत नाहीत. आई म्हणत आहे की,शेती नुकसानीचे अनुदान आलं की तुला पैसे देईन.त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या”. असे प्रताप या चिमुकल्या मुलाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहिले आहे. ‘एवढंच नव्हे तर दिवाळीला आईने केलेल्या पुरणपोळ्या खायला आमच्या घरी या, असे निमंत्रण देखील शेतकऱ्याच्या या मुलानं मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्यामुळे हे पत्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.काही दिवसांवरच दिवाळी सण येऊन ठेपला असून, त्यात गोडधोड खायला मिळावे यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान द्या. आई म्हणतेय शेती नुकसानीचं अनुदान आलं की तुला पैसे देईन. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आम्हाला लवकर अनुदानाचे पैसे द्या. असं या चिमुकल्या मुलाने मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान,समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी या मुलाच्या घरी भेट देत अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. प्रतापचे वडील जगन कावरखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर निकषात बसत असेल तर प्रतापला लवकरच घरकुलातून घर बांधून दिले जाणार आहे आणि प्रतापच्या घराचा प्रश्न मिटणार आहे.प्रतापच्या शिक्षणाची जबाबदारी व कावरखे कुटुंबाला घरकुल देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वडिलांच्या नावे फक्त 25 गुंठे जमीन
प्रतापच्या वडिलांच्या नावे फक्त 25 गुंठे जमीन आहे. बचत गटाद्वारे त्यांना वैयक्तिक स्वरूपात कर्ज देऊन लघुउद्योग सुरू करण्यासाठी कृषी विभागातर्फे मदत करण्याचे आश्वासन कृषी अधिकारी कानवडे यांनी दिले. त्यामुळे प्रतापला पुढील काही दिवसांतच हक्काचे घरकुल मिळणार आहे. यासोबतच उद्योगासाठी भांडवल उभे करुन दिले जाणार आहे. तसेच अनेकांनी मदतीचे आश्वासन दिले आहे.











































































