Last Updated on 12 Nov 2024 9:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सोलापूर । राज्यात महायुतीच्या विरोधात एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला ना दिशा ना धोरण आहे. मुख्यमंत्रीपदावरुन त्यांच्यात वाद सुरु आहेत. त्यामुळे निवडणूकीपूर्वीच त्यांच्यात वाद असल्यामुळे ते महाराष्ट्र राज्यात स्थिर आणि मजबूत सरकार देवू शकत नाहीत. त्यामुळे जनतेने महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन देशाचे भाजप नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरात केले.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज त्यांनी सोलापूरातील होम मैदान इथे सभा घेतली. देशातील आरक्षणाला काँग्रेसपासूनच धोका आहे. काँग्रेसचे नेते परदेशात जावून आरक्षण संपविण्याची भाषा बोलत आहेत. त्यामुळे देशातील एससी, एसटी आणि ओबीस समाजात सध्या गैरसमज निर्माण झाला आहे. मात्र भाजप सरकार काँग्रेसचा हा डाव कधीही पूर्ण होवू देणार नाही असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.
केंद्रातील भाजपा सरकारने आणि राज्यातील महायुतीच्या सरकारने गोरगरीबांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. गावगाड्यातील सर्व घटकांच्या उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेतून जवळपास १३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती मोदी यांनी दिली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी इथेनॉल वापरण्याची मर्यादा भाजपा सरकारने १५ टक्यापर्यंत वाढवली आहे. तर ही मर्यादा २० टक्कयापर्यंत वाढविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मोदी यांनी यावेळी जाहिर केले. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यंत ८० हजार कोटींचा लाभ होईल, असे त्यांनी सांगितले. सोलापूरातील अनेक उद्योग व्यवसाय, शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी भाजपाने मोठी मदत केली आहे. तर स्मार्ट सिटी योजनेंतर्गंत अकराशे कोटींची कामे केली असल्याचेही सांगितले. तसेच विमानसेवा, रस्त्याचे चौपदरीकरण, तीर्थक्षेत्र विकासाला चालना देण्यासाठी पालखी मार्ग असे अनेक महत्वपूर्ण प्रकल्प राबविली आहेत. भविष्यातही सोलापूरमधील चादर आणि हातमाग उद्योगाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे देखील ते म्हणाले.
महायुती सरकारने पीएम किसान योजना, लाडकी बहिण योजना या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भविष्यातही या योजना सुरुच राहतील, असे ते यावेळी म्हणाले. मोदी यांनी सुरुवातील मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात करित असतानाच मी सोलापूरात सर्वाधिक वेळा येणारा पहिला पंतप्रधान आहे. तसेच आज कर्तिक वारीच्या पार्श्वभूमीवर मला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आणि सिध्देश्वरांच्या पावन नगरीत येण्याचे भाग्य लाभल्याचे सांगितले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरी पगडी, खांद्यावर धनगर समाजाचे प्रतिक असलेली घोंगडी आणि हातात काठी देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह महायुतीचे उमेदवार उपस्थित होते.









































































