Last Updated on 13 Oct 2024 9:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । महाविकास आघाडीकडून आज एक महत्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महायुती सरकारच्या कारभारावर ‘गद्दारांचा पंचनामा’ही पुस्तिका आणि चित्रफीत महाविकास आघाडीकडून प्रदर्शित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत मविआच्या तिन्ही नेत्यांनी महायुती सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका केली.
महाविकास आघाडीने युती सरकारच्या घोटळ्यांची एक चित्रफित दाखवली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार अनिल देसाई, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत.
देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या प्रशासनाचा एक वेगळा दबदबा होता मात्र सध्याच्या सरकारनं हा नावलौकिक धुळीला मिळवला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि ते जे प्रशासकीय निर्णय घेतात, त्याची सामान्य लोकांची टिंगल व्हावी, अशी स्थिती निर्माण केली आहे असं पवार म्हणाले. राज्य सरकारनं गेल्या दोन तीन महिन्यात अनेक निर्णय घेतले या निर्णयांची अंमलबजावणी होणं शक्य आहे का? असा सवाल त्यांनी केला. यांच्या हातातून सत्ता काढावी लागेल, तरच महाराष्ट्र वाचेल असे देखील ते म्हणाले.
गद्दारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीसोबत झाली नसून महाराष्ट्राशी झालेली आहे. दोन पोलिस आयुक्त असलेले मुंबई हे एकमेव शहर आहे आणखी ५ वाढवा तुमचे जे कोणी लाडके असतील त्यांना महत्वाच्या पदावर बसवा, पण कारभाराचं काय, महिला असुरक्षित आहे, राजकारणी असुरक्षित आहेत, सत्ताधारी पक्षाचे नेते असुरक्षित आहेत, मग सामान्य जनतेच्या सुरक्षेचे काय? असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांच्या कुटुंबियांना, सेवकांना दिलेली सुरक्षा काढून तुम्ही ती सुरक्षा जनतेसाठी का वापरत नाही. पोलिस हे जनतेचे रक्षक आहेत. अभिजित घोसाळीकर यांच्या हत्येची जबाबदारी गृहमंत्र्यांची आहे, असे ते यावेळी म्हणाले. जेवढा पैसा जाहिरातीवर उधळता तेवढा जनतेच्या सुरक्षेसाठी का नाही. जनतेसाठी आम्ही लढत राहू. हा शाहु- फुलेंचा महाराष्ट्र आहे त्याला मोदी- शहा यांचा होऊ देणार नाही, असे ठाकरे म्हणाले. एक दोन दिवसात निवडणूक जाहीर होऊ शकते. अगोदर महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा मग महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करु असे ते म्हणाले.
राज्य सरकारनं अनेक महामंडळांची घोषणा केली असली तरी आधीची महामंडळं कार्यरत आहेत का हे आधी तपासले पाहिजे, शासकीय माध्यमातून राजकीय भाषणं होत आहेत, हे अयोग्य आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ज्यांनी विरोध केला त्याच विचाराचे लोक आज सत्तेत आहेत. या सरकारच्या भ्रष्टाचारामुळेच मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून विटंबना करण्याचं पाप केलं, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप माफी मागितली नाही. शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं पाप शिंदे फडणवीस सरकारनं केलं आहे. महायुती सरकार हे गुजरात धार्जिणे आहे, या सरकारला सत्तेतून बाहेर काढणे, हेच महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. महायुती सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही, पीक विम्यातून शेतकऱ्यांचा फायदा होत नाही. अतिवृष्टीनंतर केंद्राचं पथक आंध्र प्रदेशात गेले पण महाराष्ट्रात आले नाही. महाराष्ट्रात दररोज ७ शेतकरी आत्महत्या होत आहेत. तरुण मुले शिक्षण घेऊन नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण या सरकारने सर्व उद्योग आणि रोजगार गुजरातला पळवले आहेत, आता हे सरकार घालवले पाहिजे.’ असे ते म्हणाले.
Source : shabd.prasarbharat










































































