Last Updated on 24 Nov 2024 10:08 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित करण्यापूर्वी युतीमधले तिन्ही पक्ष आपापल्या विधीमंडळ पक्षांच्या स्वतंत्र बैठका घेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. या बैठकीला पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
शिवसेनेच्या आमदारांचीही आज बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या सर्व निर्णयांचे एकाधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेली आचारसंहिता संपेल, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा – यंदा विधानसभेत भाऊ, बहीण, सासरे-जावयासह सर्वांत तरुण आमदार करणार प्रवेश
दरम्यान, या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला विक्रमी यश मिळालं, तर काँग्रेस आणि महाविकास आघाडीला कधी नव्हे इतक्या कमी जागा मिळाल्या. पुणे शहर आणि जिल्ह्यातही महायुतीनं वर्चस्व मिळवलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या 11 पैकी 10 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. वडगांव शेरीची एक जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मतदारांनी महायुतीच्या बाजूने कौल असून 10 पैकी 8 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. एक जागा महाविकास आघाडीला मिळाली तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली बारामतीची जागा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी मोठ्या मताधिक्यानं जिंकली.
पुणे शहरातल्या विविध मतदार संघांत मतदारांनी भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. कसबा पेठ मतदारसंघात हेमंत रासने, कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटील, पर्वती मतदारसंघात माधुरी मिसाळ, शिवाजीनगर मतदारसंघात सिद्धार्थ शिरोळे, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे आणि खडकवसला मतदार संघात भीमराव तपाकीर हे भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. हडपसर मतदार संघातही महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे चेतन तुपे यांनी विजय मिळवला आहे.
हेही वाचा – भाजपला एकूण मतदानाच्या २६.७७ टक्के मतदान तर काँग्रेसला १२.४२ टक्के इतकं मतदान
वडगांव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे यांना विजय मिळाला आहे. दरम्यान पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात ईव्हीएम यंत्रणेत गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ. हुलगेश चलवादी यांनी केला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती डॉ. चलवादींनी दिली आहे.
साभार : प्रसार भारती









































































