Last Updated on 25 Jan 2022 11:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली |
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकर(सेवानिवृत्त), ले.जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य 11 अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लष्कराच्या एकूण 317 आणि नौदलाच्या एकूण 34 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ जाहीर केले आहेत. या पदकांमध्ये 22 ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम),4 ‘उत्तम युध्द सेवा पदक’(युवायएसएम),40 ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम) ,6 ‘शौर्य चक्र’, 84 ‘सेना पदक’ (शौर्य) ,10 ‘युध्द सेवा पदक’, 40 ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा), 93 ‘विशिष्ट सेवा पदक’ तसेच लष्कराच्या विविध ऑपरेशनसाठी 44 पदक आणि नौदलाच्या 8 नौसेना पदकांचा समावेश आहे.
‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राला ‘परम विशिष्ट सेवा पदक
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या सुभेदार नीरज चोप्रा याला ‘परम विशिष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात येणार आहे.ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू आहे. त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 87.58 मीटर भाला फेकून भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याला ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.नीरज चोप्रा सध्या भारतीय लष्करात नायब सुभेदार या पदावर आहे. तो मूळचा हरियाणातील पानिपत येथील आहे.2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 82.23 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर 2017 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीरजने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 86.47 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले.
मुळचे महाराष्ट्राच्या असलेल्या लष्कर व नौदलाच्या सेना अधिकारी व जवानांना ३ ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), २ ‘सेना पदक’ (शौर्य), २ ‘सेना पदक’ (विशिष्ट सेवा) आणि ७ ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहेत.
तीन सेनाधिकाऱ्यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’
लष्काराच्या सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि लेफ्टनंट जनरल मनोज पांडे या लष्काराच्या दोन सेनाधिकाऱ्यांना तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना सर्वोच्च मानाचे परम विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.
दोन ‘सेना पदक’ (शौर्य)
१६-मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे नायक निलेश मल्हारराव देशमुख आणि २४-मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे शिपाई अण्णासाहेब निंगप्पा दुंडगे यांना ‘सेना पदक’ (शौर्य) जाहीर झाले आहे.
दोन ‘सेना पदक’ (विशिष्ट)
मराठा लाईट इन्फेन्ट्रीचे ब्रिगेडीयर पराग केशवराव नांगरे आणि ८-ग्रेनेडीयरचे कर्नल कौस्तुभ उल्हास केकरे यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘सेना पदक’ (विशिष्ट) जाहीर झाले आहे.
सात : ‘विशिष्ट सेवा पदक’
लष्कराच्या सिग्नल रेजिमेंटचे मेजर जनरल कुलभूषण हनुमंत गवास, लष्कराच्या पोस्ट सेवेचे मेजर जनरल वसंत महेश दामोदर, इंटेलिजन्स कॉर्प्सचे कर्नल किरण नारायण कुलकर्णी, लष्कर अभियांत्रिकीचे कर्नल अजय लोंढे आणि आर्मोरेड कॉर्प्सचे लेफ्टनंट कर्नल महेश विष्णु जाधव यांना ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. तसेच, नौदलाचे कमोडोर विद्याधर हरके आणि कमांडर योगेश आठवले यांनाही ‘विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.
‘परम विशिष्ट सेवा पदक’, ‘शौर्य पदक’ विजेत्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन
मुंबई |
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकर(सेवानिवृत्त), ले.जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य 11 अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत. हा आपल्या राज्याचा गौरव आहे. महाराष्ट्रातील या पदक विजेत्या अधिकाऱ्यांनी आपल्या राज्याची मान देशात उंचावली असून त्यांच्या कामगिरीचा, कर्तृत्वाचा सार्थ अभिमान असल्याचे गौरोवोद्गार काढत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदक विजेत्या अधिकारी, जवानांचे अभिनंदन केले आहे.भारतीय सैन्य दलात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रच्या शूर-वीर अधिकारी, जवानांचा झालेला सन्मान सर्वांना प्रेरणा देणारा आहे. ही बाब राज्यासाठी अभिमानाची आनंदाची असल्याचे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी पदक विजेत्या अधिकारी, जवानांचे अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. तसेच सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.









































































