Last Updated on 21 Jul 2023 10:54 PM by Sanjay Patil/Adhorekhit
ठाणे । महाज्योती मार्फत यूपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहाराची नियमानुसार चौकशी सुरू केली आहे. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला असून परीक्षे दरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महाज्योतीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महाज्योतीच्या वतीने यूपीएससी पूर्व प्रशिक्षणासाठी दि.16 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात प्रवेश परीक्षा घेण्यात आली. महाज्योती मार्फत विविध प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यासाठी एजन्सी निवडण्याकरीता ई-निविदा प्रक्रिया करण्यात आलेली होती. निविदा प्रक्रियेतून परीक्षा घेणारी एजन्सी नियुक्त करण्यात आली. सदर एजन्सी मार्फत महाज्योती करीता यूपीएससी पूर्व प्रशिक्षणाच्या प्रवेशासाठी परीक्षा आयोजित केलेली होती. या परीक्षेसाठी 20218 उमेदवार पात्र होते त्यातील 13184 उमेदवारांनी महाराष्ट्रातील 102 परीक्षा केंद्रांवर तर दिल्ली येथील 2 परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. परीक्षा झाल्यावर काही परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महाज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या. सदर तक्रारीच्या अनुषंगाने महाज्योती कार्यालयाने मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.
चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला सदर प्रकरणात CCTV फुटेज तपासून गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला आहे. अशा प्रकारे सदर प्रकरणाची चौकशी महाज्योतीने सुरु केलेली आहे. परीक्षे दरम्यान गैरव्यवहार करणाऱ्या विद्यार्थ्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे महाज्योतीच्या परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मनात कोणताही संभ्रम ठेवू नये तसेच कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महाज्योतीमार्फत करण्यात आले आहे.










































































