Last Updated on 10 Dec 2025 9:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली। दिवाळीला युनेस्को (संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना) च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजेच अमूर्त जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. युनेस्कोने बुधवारी याची घोषणा केली आणि भारताचे अभिनंदन केले. यासोबतच घाना, जॉर्जिया, काँगो, इथिओपिया आणि इजिप्तसह अनेक देशांची सांस्कृतिक प्रतीके देखील या यादीत जोडली गेली आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी तसेच 194 सदस्य देशांतील प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि युनेस्कोच्या जागतिक नेटवर्कचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत या संबंधीची नोंदणी स्वीकारण्यात आली.
हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा दिल्ली युनेस्कोच्या अमूर्त वारसासाठी आंतर-सरकारी समितीच्या २० व्या बैठकीचे यजमानपद भूषवत आहे, जी ८ ते १३ डिसेंबरपर्यंत सुरू आहे. याच संधीचे औचित्य साधून केंद्र सरकारने १० डिसेंबर रोजी विशेष दिवाळी समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून जगासमोर भारताची सांस्कृतिक ओळख प्रभावीपणे सादर करता येईल. कार्यक्रमाचे मुख्य ठिकाण लाल किल्ला असेल. येथे परदेशी पाहुणे आणि देशाचे मोठे अधिकारी दीपप्रज्वलनाचा विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक कलेचे प्रदर्शन पाहतील. राजधानी सजवण्याची जबाबदारी दिल्ली सरकारला देण्यात आली आहे. संपूर्ण शहरात दिवे लावले जातील, सजावट केली जाईल, पणत्या लावल्या जातील आणि वेगवेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम केले जातील.

सर्व सरकारी इमारती सजवल्या
दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा यांनी सांगितले की, १० डिसेंबर रोजी दिल्ली सरकार स्वतंत्रपणे दिवाळी साजरी करण्यात आली असून सर्व सरकारी इमारती सजवल्या आहेत, दिल्ली हाटमध्ये विशेष कार्यक्रम होत असून लाल किल्ल्यावर पणत्या लावण्यात आल्या होत्या. आदल्या दिवशी मंगळवारी रात्री दिल्ली सचिवालयाला तिरंगी रंगांच्या रोषणाईने उजळण्यात आले होते. सरकारचा उद्देश दिवाळीला अंधारातून प्रकाशाकडे नेणारा जागतिक संदेश म्हणून सादर करणे आहे, जेणेकरून यूनेस्कोच्या यादीत भारताचा दावा अधिक मजबूत होईल. दिल्ली सरकारने लोकांनाही आवाहन केले आहे की त्यांनी शहरात होणा-या समारंभांमध्ये सहभागी व्हावे आणि एकत्र येऊन हा ऐतिहासिक क्षण साजरा करावा.
भारताचे १५ वारसे आधीच यादीत

युनेस्कोची ही यादी जगातील अशा सांस्कृतिक आणि पारंपरिक गोष्टींचा समावेश करते, ज्यांना स्पर्श करता येत नाही पण अनुभवता येते. याला अमूर्त जागतिक वारसा असेही म्हणतात. याचा उद्देश आहे की हे सांस्कृतिक वारसे सुरक्षित राहावेत आणि येणा-या पिढ्यांपर्यंत पोहोचावेत. सध्या, भारताचे १५ वारसे आधीच इंटॅन्जिबल कल्चरल हेरिटेज म्हणजेच अमूर्त जागतिक वारसाच्या यादीत स्थान मिळवून आहेत. यात दुर्गा पूजा, कुंभमेळा, वैदिक मंत्रोच्चार, रामलीला, छऊ नृत्य यांचाही समावेश आहे.











































































