Last Updated on 05 Jul 2024 2:18 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून प्रथमच दिंडी सोहळा निघणार असून आषाढी वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रीरामाच्या पादुका विठ्ठलाच्या भेटीला जाणार आहेत.आषाढी वारीसाठी बहे-हुबालवाडी येथून श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी निघणार आहे.येथील रामलिंग बेटावरून 8 जुलै रोजी दुपारी 2 वाजता पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे..
बहे (ता. वाळवा) येथील रामलिंग बेटावर 8 जुलै रोजी सकाळी प्रभू श्रीरामाच्या पादुका अभिषेक व प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.रथामधून व पालखींमधून पादुकांसह रामलिंग बेट येथून 8 तारखेला दुपारी 2 वाजता दिंडीची सुरुवात होणार आहे.सायंकाळी 6 वाजता येथील श्री मारुती मंदीर येथे पादुका ठेवण्यात येणार आहेत.पहिला मुक्काम बहे येथे होणार आहे.तेथून दुसऱ्या दिवशी सकाळी 9 तारखेला संपूर्ण बहे व हुबालवाडी ग्रामस्थांच्या वतीने आरती होवून पुढील प्रवासासाठी दिंडीचे प्रस्थान होणार आहे.
ब्रह्मचैतन्य वैकुंठवाशी ह.भ.प. गुरुवर्य तात्यासाहेब वास्कर यांच्या कृपाशीर्वादाने या श्रीराम आषाढी पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पायी दिंडी व पालखी 9 तारखेला घोगाव, 10 तारखेला आळसंद, 11 तारखेला भांबुर्डे, 12 तारखेला घरनिकी, 13 तारखेला निंबवडे,14 तारखेला चिकमहूद, 15 तारखेला सोनके, 16 तारखेला पंढरपूर येथे पोहोचणार आहे. 16 व 17 तारखेला पंढरपूर मुक्कामी असणार आहे.व 18 तारखेला संतपंगत घेऊन परतीचा प्रवास असा एकंदरीत सोहळ्याचा दिनक्रम असणार आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान घरनिकी,निंबवडे आदी चार ठिकाणी वारकऱ्यांचा रिंगण सोहळा रंगेल.हा आयोजित करण्यात येत असलेला रिंगण सोहळा म्हणजे वारीतील प्रमुख आकर्षण असणार आहे.या पालखी सोहळ्यात ‘राजा बादल’ हा मानाचा अश्व असणार आहे.ह.भ.प. लखन कोकीळ महाराज हे दिंडी चालक आहेत.या दिंडीमध्ये काही बैल जोडीही सहभागी होणार आहेत.महिला वारकऱ्यांसाठी ट्रॅक्टरची सोय तसेच सहभागी वारकऱ्यांना अंघोळीसाठी गरम पाण्याची सोय करण्यात येणार आहे.
दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे.या पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे नियोजन माजी सरपंच सुधीर रोकडे, संजय विठ्ठल हुबाले, विकास भोसले, महादेव घोरपडे, भीमराव अरबुने, संजय जाधव, दिनकर पाटील, रसाळ, अरुण हुबाले, राजाराम नांगरे, पोपट हुबाले, बी.जी. मोहिते, यशवंत मोहिते आदी करत आहेत.












































































