Last Updated on 30 Jan 2024 8:30 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । प्रकाश हॉस्पिटलमध्ये नव्याने सुरू करण्यात आलेले कॅथलॅब सेंटर हृदय रूग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल, असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.
प्रकाश हॉस्पिटल व साई अभिरणा कार्डियाक केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाश हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब सेंटर सुरू करण्यात आले आहे.त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.हृदयरोग तज्ञ डॉ. सुनील अग्रवाल,के. एल. ई. बेळगावचे हृदयरोग प्रमुख डॉ. महादेव दीक्षित, प्रकाश शिक्षण मंडळाचे सचिव नितीन भोसले-पाटील, सुनीता भोसले-पाटील, प्रकाश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, प्रकाश हॉस्पिटलचे मानद सचिव धैर्यशील पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.भूपाल गिरीगोसावी, डॉ.अक्षय शिवछंद, डॉ.विजय पाटील प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नूतन कॅथलॅब सेंटरचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी निशिकांत भोसले-पाटील म्हणाले,प्रकाश हॉस्पिटलमध्ये हृदयाची अॅन्जीओग्राफी, अॅन्जीओप्लास्टी तसेच स्ट्रेस टेस्ट, हृदयाची टेस्ट, सोनोग्राफी इत्यादी सुविधांसह सुसज्ज असा इमर्जन्सी आय.सी. यु. विभाग कॅथलॅबसह सर्व हृदयरोग रूग्णासाठी सुरू करण्यात आला आहे. यामध्ये रुग्णांवर महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार होणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्याने वाळवा-शिराळा तालुक्यातील रुग्णांना आता पुणे, मुंबई, कोल्हापूर सारख्या आदी ठिकाणी उपचारासाठी जाण्याची गरज भासणार नाही. तसेच रुग्णांचा वेळ व पैशाची बचतही होणार आहे. तरी रुग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
यावेळी डॉ. शिवानंद दोडामनी, डॉ.रोहिणी करंबेळकर, डॉ.वीरेंद्र मिनकीरे, मधुकर नायर, डॉ. स्वाती औंधकर यांच्यासह प्रकाश हॉस्पिटलचे सर्व संचालक, डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. अभिमन्यू पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रणजित पाटील यांनी आभार मानले.
हृदयरोग तज्ञांसह अनुभवी स्टाफ…
प्रकाश हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या कॅथलॅबसाठी हृदयरोग तज्ञ डॉ. सुनील अग्रवाल तसेच डॉ. राहुल वालकर यांच्यासह साई अभिरणा कार्डियाक सेंटरचा तज्ञ अनुभवी प्रशिक्षित स्टाफ पूर्णवेळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे रुग्णांवर योग्य उपचार होण्यास मदत होणार आहे. तरी हृदयरोग रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.










































































