Last Updated on 12 Mar 2023 11:47 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई | राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून उन्हाच्या तडाख्याने नागरिकांचे हाल होत आहेत.मागील आठवड्यात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने द्राक्षांसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.त्यानंतर आता पुढील 72 तासांत राज्यांमध्ये पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटासह अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
याबाबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,15 मार्च दरम्यान देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे.
तसेच आज आणि उद्या जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये विजांचा कडकडाट पावसाची शक्यता आहे.तर 13 आणि 14 तारखेला हिमाचल प्रदेश व राजस्थानमध्ये हवामान खराब असणार आहे.याशिवाय 13 आणि 14 तारखेला उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीटीसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
12 ते 18 मार्चपर्यंत अनेक राज्यांमध्ये हवामान खराब असेल,असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.तसेच दक्षिण मध्य प्रदेश,विदर्भ,मराठवाडा, तेलंगणा,आंध्र प्रदेश आणि उत्तर कर्नाटकावर याचा परिणाम दिसून येणार असून 15 ते 16 मार्च दरम्यान मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 13 मार्चपासून पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.17 मार्च पर्यन्त राज्यात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.काही ठिकाणी गरपीट तर काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.मध्य महाराष्ट्र, विदर्भ,मध्य प्रदेश ते उत्तर प्रदेशपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने तसेच अरबी समुद्रातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे हा पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातही पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
दरम्यान,13 मार्च नंतर पुन्हा एकदा वातावरणात मोठा बदल होणार असून 14 मार्च ते 20 मार्च दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या कालावधीत कोसळणारा पाऊस हा राज्यातील अनेक जिल्ह्यात कोसळेल असा अंदाज वर्तवला जात आहे.












































































