Last Updated on 30 Apr 2023 6:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शंभराव्यांदा मन की बात या कार्यक्रमांतून देशवासियांशी मनमोकळा संवाद साधला.मोदी म्हणाले, हा कार्यक्रम म्हणजे, माझ्या मनाची अध्यात्मिक यात्रा !
हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला.तसेच,भाजपकडून देशभरात ठिकठिकाणी लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले होते.विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती होती.
शंभराव्या मन की बातमध्ये बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की,शंभराव्या पर्वाबाबत हजारो पत्र आणि मेसेज आले आहेत.ही पत्रं वाचून माझं मन भावूक झालं. मन की बातचे शंभर भाग पूर्ण केल्याबाबत अनेकांनी माझं अभिनंदन केलं,पण खरे अभिनंदनाचे पात्र मन की बातचे श्रोते आहेत.पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की,मला तुमच्या सर्वांची हजारो पत्रं आली आहेत, लाखो संदेश आले आहेत आणि मी जास्तीत जास्त पत्रं वाचण्याचा प्रयत्न केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या पहिल्या भागाची आठवण सांगितली.ते म्हणाले, 3 ऑक्टोबर 2014 हा विजया दशमीचा सण होता आणि आपण सर्वांनी मिळून विजया दशमीच्या दिवशी ‘मन की बात’चा प्रवास सुरू केला.विजया दशमी म्हणजेच,वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण, ‘मन की बात’ हा देखील देशवासियांच्या चांगल्या सकारात्मकतेचा अनोखा सण बनला आहे.असाच एक सण,जो दर महिन्याला येतो,ज्याची आपण सगळे वाट पाहत असतो.
विलेपार्ले येथील कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती

विलेपार्ले येथील ‘मन की बात’ कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विलेपार्ले येथील घैसास सभागृहात उपस्थित होते.
कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, आमदार आशिष शेलार, पराग आळवणी, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मराठी अभिनेते सचिन खेडेकर यांच्यासह विलेपार्ले परिसरातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.सर्व मान्यवरांचे सकाळी 10.45 वाजता घैसास सभागृहात आगमन झाले. मान्यवरांच्या सन्मान कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रसारण सुरू झाले. लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवून 100 व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे स्वागत केले. या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सोय मुंबईतील 5 हजार 200 ठिकाणी करण्यात आली होती.
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला कलाकारांची जत्रा!
राजधानी दिल्लीत ‘मन की बात @ 100’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी मन की बातचा 100 वा भागानिमित्त आयोजित कार्यक्रमात 100 लोक सहभागी झाले होते.बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री रवीना टंडनही यांच्याबरोबर शाहिद कपुर आणि माधुरी दिक्षित यांचाही सामावेश होता.माधुरी दीक्षित आणि एकता कपूर सारख्या ख्यातनाम सेलिब्रिटींनी ‘मन की बात’ वरील पंतप्रधान मोदींच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली.









































































