Last Updated on 31 Dec 2024 9:42 AM by Sanjay Patil/Adhorekhit
श्रीहरीकोटा । भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अंतराळात आपले पराक्रम दाखवून स्पेस डॉकिंग प्रयोग (SpaDeX) मोहीम यशस्वीपणे प्रक्षेपित केली आहे. ISRO ने PSLV रॉकेटचा वापर करून श्रीहरीकोटा येथून सोमवारी रात्री १० वाजता स्पॅडेक्स मिशन (स्पेस डॉकिंग प्रयोग) लाँच केले. या यशासह, स्पॅडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे.
भारताने 2024 मध्ये PSLV-C60 रॉकेटद्वारे SpaDex मोहीम यशस्वीपणे पार पाडली. ही मोहीम अंतराळात दोन स्पेसक्राफ्टची डॉकिंग आणि अनडॉकिंग करण्याशी संबंधित आहे. इस्रोने या डॉकिंग तंत्रज्ञानावर पेटंट मिळवले आहे.
भारताने श्रीहरिकोटा येथून PSLV-C60 रॉकेटमधून 2 छोटे स्पेसक्राफ्ट लॉन्च केले आहेत. जेव्हा इस्रो पृथ्वीपासून 470 किलोमीटर वर दोन रॉकेट्सची डॉकिंग आणि अनडॉकिंग करणार हे पहिल्यांदाच घडणार आहे. म्हणजे हजारो किलोमीटरच्या वेगाने जाताना दोन स्पेसक्राफ्टला आधी जोडलं गेलं. त्यानंतर त्यांना पुन्हा वेगळं केलं जाणार आहे. SpaDex लॉन्च करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.

स्पेस डॉकिंग म्हणजे काय?
स्पेस डॉकिंग ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये दोन स्पेसक्राफ्ट एकमेकांना जोडतात आणि एक युनिट म्हणून कार्य करतात. या मोहिमेत दोन उपग्रह आहेत. पहिला पाठलाग आणि दुसरा लक्ष्य. चेझर उपग्रह लक्ष्य पकडेल. त्यासोबत डॉकिंग करणार आहे.
उपग्रहातून एक रोबोटिक हात बाहेर आला आहे, जो हुकद्वारे लक्ष्य स्वतःकडे खेचून घेईल. हे लक्ष्य वेगळे क्यूबसॅट असू शकते. या प्रयोगामुळे भविष्यात इस्रोला कक्षेतून बाहेर पडून वेगळ्या दिशेने जाणाऱ्या उपग्रहांना पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञान मिळणार आहे.
इस्रोच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ यशस्वी मोहिमेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीयांना अप्रतिम वैज्ञानिक भेट दिली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ‘स्पॅडेक्स PSLV-C60’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या यशाचे कौतुक करत या संशोधन प्रकल्पात सहभागी इस्रोच्या वैज्ञानिक, अभियंते यांचे अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, या मोहिमेमुळे भारताला अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यान ‘डॉकिंग’ ‘अनडॉकिंग’ करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. अंतराळातील दोन उपग्रह किंवा उपकरणे जोडून नवीन रचना तयार करण्याच्या या क्षमतेतून भविष्यातील अनेक महत्त्वाचे संशोधन प्रकल्प राबविणे शक्य होणार आहे. यातून जगात अंतराळ संशोधनात अशी मजल गाठणारे भारत चौथे राष्ट्र ठरणार आहे, याचाही भारतीयांना सार्थ अभिमान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला बळ देणारी ही कामगिरी आहे. भारतीय अंतराळ संशोधनाचे अवकाश विस्तारणारी ही कामगिरी आहे. यामुळे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या शिरपेचात ‘इस्रो’ने मानाचा तुरा रोवला आहे. या मोहिमेत सहभागी इस्रोचे वैज्ञानिक, अभियंते तसेच भारतीय अंतराळ विज्ञान विभागातील सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि यापुढेही या मोहिमेत सुरू राहणाऱ्या विविध प्रयोग, संशोधन प्रकल्पांना हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.












































































