Last Updated on 14 Oct 2023 4:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । इस्लामपूर येथील मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आयोजित अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत गौरी गीतगायन,गौरी नृत्यातून नवतरुणींनी महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले.निमित्त होते गौरी गीत व नृत्य स्पर्धेचे!
मालती वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये सांस्कृतिक विभाग आयोजित अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत गौरी गीतगायन,गौरी नृत्य व उखाणे स्पर्धा पार पडल्या.अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.अंकुश बेलवटकर होते.
प्रमुख अतिथी पदावरून बोलताना सौ.सुवर्णा माळी म्हणाल्या, लोकसंस्कृतीमधील सर्वात मोठा व उत्साहवर्धक सण हा गौरीचा आहे. गौरी गीते व गौरीचे खेळ हा आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून त्याद्वारे महिलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य उत्तम जपले जाते.त्यामुळे नव्या युगातील नवतरुणींनी गौरी सणातील गीते व खेळ आत्मसात करावेत” असे आवाहन यांनी केले.
सौ.माळी पुढे म्हणाल्या,भाद्रपदात शुद्ध पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन होते.तेव्हा त्या नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन करतात.हा उत्सव तीन दिवस चालतो.ज्येष्ठा गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे. त्यामधील एक गौरी घरातच असते, तीच लक्ष्मी होय. एक गौरी बाहेरून आणली जाते, तीच ज्येष्ठागौरी होय. कुमारिका व सवाष्णी तीन दिवस गौरी गीते व गौरीचे खेळ खेळतात सर्व सुख दुःख विसरून आनंदाने सर्व सख्या एकत्र येऊन गौराईची उपासना करतात.
स्वागत व प्रास्ताविक करताना प्रा. डॉ.राम घुले म्हणाले,आर्यपूर्व,कृषीप्रधान,मातृसत्ताक परंपरेतील नवसृजनाचा कृषिमाया विधी म्हणून गौरी उपासना केली जात होती.सिंधू कृषिजन मोठ्या उत्साहात हा सण साजरा करीत असत.भूमी आणि स्त्री यांच्यातील सहभावात्मक सुफलीकरणाचा हा विधी असतो.ज्येष्ठा अर्थात अलक्ष्मी म्हणजेच निऋत्ती देवता होय शैवसंप्रदायाने पार्वतीच्या रूपात तिला पुजले तर काहींनी महालक्ष्मीच्या रूपात उपासले.
गौरी नृत्य/खेळ स्पर्धेत प्रथम क्रमांक बी. कॉम. भाग- तीन व द्वितीय क्रमांक बी.ए. भाग दोनच्या विद्यार्थिनी पटकाविला.गौरी गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्नाली काळे व द्वितीय क्रमांक अनिषा कोळेकर व तृतीय क्रमांक वर्षा लोहार हिने पटकाविला.स्पर्धेचे परीक्षण सौ .वैशाली माळी सौ.अपर्णा माळी सौ.शिल्पा आवटे सौ .प्रगती पाटील व जयश्री पाटील यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा. शैलजा पाटील व प्रा. प्रतीक्षा बाबर यांनी केले.कार्यक्रमास प्रा.डॉ. स्नेहल हेगिष्टे प्रा. डॉ. मेघा पाटील,प्रा. डॉ. वर्षा पाटील व प्रा. के. बी. पाटील व इतर शिक्षक उपस्थित होते.आभार प्रा. डॉ. वृषाली पाटील यांनी मानले.












































































