Last Updated on 15 May 2023 8:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । येत्या काही दिवसांत देशाच्या विविध भागातल्या कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले.येत्या दोन ते तीन दिवसात पूर्व किनाऱ्यावर उष्णतेची लाटसदृश स्थिती राहील,असा अंदाज आहे.महाराष्ट्रातल्या विदर्भात तुरळक ठिकाणी आज उष्णतेची लाट आहे.तर ओदिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर येत्या दोन दिवसात उकाडा कमालीचा वाढण्याची शक्यता आहे.
येत्या पाच दिवसात ईशान्येकडच्या राज्यांत पावसाची शक्यता आहे.राज्यात गेल्या २४ तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.
विदर्भात तरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.सोलापूर,औरंगाबाद,परभणी,नांदेड,बीड,अकोला,बुलडाणा,अमरावती, चंद्रपूर,गोंदिया,नागपूर,वर्धा, यवतमाळ या ठिकाणी पारा ४० अंशाच्या वर गेला आहे.अकोल्यात सर्वाधिक ४५.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.अमरावतीतही ४५.४ ,तर वर्ध्यात ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली वाढते उष्णतामान बघता या पार्श्वभूमीवर लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केले आहे.अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा,त्यासाठी छत्री किंवा स्कार्फ वापरा,असे आवाहनही करण्यात आले आहे.









































































