Last Updated on 15 Oct 2024 8:48 AM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन आता बदलण्यात आली असून तलाठी पदाचे पदनाम बदलून ‘ग्राम महसूल अधिकारी’ असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
राज्यातील महसूल विभागातील विविध पदांची नावे ब्रिटिश कालीन असून ही नावे बदलण्याबाबत महसूल कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीबाबत सकारात्मकता दाखवून लवकरच ही पदनामे बदलून मराठीला साजेशी अशी नावे देण्याबाबत निर्णय करण्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली होती. त्यानुसार महसूल विभागातील विविध पदांची नावे बदलण्यात आली आहेत.
महसुल विभागांतर्गत क्षेत्रिय कार्यालयातील अव्वल कारकून गट-क पदाचे पदनाम बदलून सहाय्यक महसुल अधिकारी असे करण्यात आले आहे. तर कोतवाल पदाचे पदनाम बदलून महसूल सेवक असे करण्यात आले आहे.
तलाठ्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम १४, ७६, १४९, १५०, १५१, १५३, १५४ या कलमात नमूद केलेली कर्तव्ये व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. जिल्हाधिकारी याने नमूद केलेली नोंदणीपत्रके, रजिस्टरे व जमाखर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते. जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व रकमा त्यास गोळा कराव्या लागतात. कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल ते गावासंबंधी लिहिण्याचे काम तलाठयास करावे लागते. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्याद्वारे करण्यात येत होती. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून “ग्राम महसूल अधिकारी” असे पदनाम करण्यात आले आहे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.






































































