Last Updated on 14 Jun 2023 7:41 PM by Sanjay Patil/Adhorekhit
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्याकरिता तात्काळ ई -केवायसी करण्याचे आवाहन
नागपूर । केंद्र सरकारने या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्याचे लाभ जमा करावयाच्या बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न (जोडणे) व ई-केवायसी प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे.या दोन्ही बाबी स्वतः लाभार्थीने परिपुर्ण केल्याशिवाय त्यास पुढील हप्त्याचा लाभ अदा होणार नाही. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा.प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबाला दोन हजार प्रती हप्ता प्रमाणे सहा हजार प्रति वर्ष लाभ केंद्र शासनामार्फत देण्यात येतो.योजनेचा चौदावा हप्ता जून 2023 मध्ये जमा होणार आहे.या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाची जोडून घ्यावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लाभार्थ्यांनी आधार कार्ड व मोबाईल क्रमांकाच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते उघडावे.सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासाच्या आत जोडले जाईल. सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयबीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांनी इतर बँकेत जाण्याऐवजी पोस्टातच खाते उघडावे असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच पीएम किसान ई -केवायसी प्रमाणे करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान जीओआई नावाचे ॲप गुगल प्लेस्टोअरमधून डाऊनलोड करावे. पी एम किसान संदर्भात नवीन ॲप आला असून जुने ॲप बदलून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. यासाठी अडचण आल्यास नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे यांनी केले आहे.









































































