Last Updated on 22 Jan 2022 3:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे ।
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचं आज(शनिवार) पहाटे निधन झाले आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक-अभिनेते जयराम शिलेदार व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या त्या कन्या होत्या.वयाच्या दहाव्या वर्षी कीर्ती शिलेदार यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवले होते.त्यांनी संगीत कान्होपात्रा,ययाती आणि देवयानी,संशय कल्लोळ, स्यंवर, संगीत सौभद्र,मृच्छ कटिक,मंदोदरी, एकच प्याला या सारख्या नाटकांना कीर्ती शिलेदार यांचा सूर मिळाला होता.अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत. महाराष्ट्राच्या प्रतिनिधी या नात्याने त्यांनी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये सदस्य म्हणूनही काम केले आहे.
कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. त्यांच्या १९०० च्या आसपास मैफली झाल्या. आपल्या आई, वडिलांची संगीत मराठी नाटकांच्या सेवेचा हाच वारसा जपताना कीर्ती शिलेदार यांनी, कीर्ती आणि पैशाचा मोह बाजूला ठेवत, मराठी संगीत रंगभूमीची सेवा पाच दशकांहून अधिक वर्षे अविरतपणे केली.
ध्वनिमुद्रित झालेली नाट्यगीते आणि नाटकाचे नाव
अहो इथं मांडिला (संगीत स्वरसम्राज्ञी), एकला नयनाला विषय (संगीत स्वयंवर), एकलीच दीपकळी मी (संगीत स्वरसम्राज्ञी), कशि केलीस माझी दैना (संगीत स्वरसम्राज्ञी), दयाछाया घे निवारुनिया (संगीत एकच प्याला), नरवर कृष्णासमान (संगीत स्वयंवर), नाही मी बोलत (संगीत एकच प्याला), नृपकन्या तव जाया (संगीत स्वयंवर), पांडवा सम्राट पदाला (संगीत द्रौपदी), पावना-वामना-या मना (संगीत सौभद्र), पाही सदा मी (संगीत मानापमान), बलमा आये रंगीले (संगीत स्वरसम्राज्ञी), भक्ताचिया काजासाठी (संत अमृतराय महाराज यांचा अभंग), मम सुखाचि ठेव (संगीत स्वयंवर), येतील कधी यदुवीर, रे तुझ्यावाचून काही (संगीत स्वरसम्राज्ञी), लाजविले वैर्यांना (संगीत द्रौपदी), सखे बाई सांगते मी (रंगात रंगला श्रीरंग), हरीची ऐकताच मुरली (रंगात रंगला श्रीरंग)
पुरस्कार
महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६), महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार (२०१४)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली
मुंबई |
संगीत रंगभूमीलाच आपला श्वास, ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाबद्दल वाहिली आहे.
शिलेदार कुटुंबियांनी संगीत रंगभूमीची अखंड सेवा केली. त्यांचे हे योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी कृतज्ञताही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, मराठी संगीत रंगभूमीच्या वैभव जतनाचे मोठे श्रेय शिलेदार कुटुंबियांकडे निश्चितच जाते. ज्येष्ठ रंगकर्मी जयराम आणि जयमाला शिलेदार यांनी आपल्या साधनेतून संगीत नाटक हे घराघरात पोहोचवले. त्याच पंक्तीत पुढे जाऊन त्यांच्या कन्या ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी संगीत रंगभूमीची सेवा केली. त्यांनी नव्या पिढीला संगीत नाटक आणि त्याचा दिमाख दाखवून दिला. संगीत रंगभूमीलाच त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीच्या परंपरेत पिढ्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री
“ज्येष्ठ अभिनेत्री, शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी आपल्या सुरेल गायन आणि सदाबहार अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. देशविदेशात स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण केला. आई जयमाला आणि वडील जयराम शिलेदार यांचा कलेचा वारसा पुढं नेताना मराठी रंगभूमी समृद्ध करण्यात योगदान दिलं. त्यांचं निधन ही मराठी रंगभूमी, महाराष्ट्राच्या कलाक्षेत्राची मोठी हानी आहे. मी कीर्तीताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सूरांची शिलेदारी जपणारी आणि वाढवणारी महान गायिका हरपली–सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख
संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी कीर्ती शिलेदार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.कीर्तीताईंनी आपल्या आई-वडिलांकडून मिळालेला संगीत आणि अभिनयाचा वारसा जपला आणि पुढे वाढवत नेला. आपल्या गोड गायनाने आणि प्रसन्न अभिनयाने कीर्तीताईंनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. संगीत रंगभूमीची सेवा करण्याचे आई-वडिलांचे व्रत त्यांनीही जोपासले आणि खूप कष्ट सोसून संगीत रंगभूमी जागती ठेवली. त्यांचे हे उपकार संगीत रंगभूमी कधीही विसरू शकणार नाही, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.










































































