Last Updated on 23 Jul 2022 9:39 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई ।
राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत 284 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवार (दि.22) काढले आहेत.
या आदेशात मंगळवार (दि.26) रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणासाठी नोटीफिकेशन जाहीर होणार असून त्यानंतर गुरूवार (दि.28) झेडपी गटांसाठी जिल्हाधिकारी तर पंचायत समिती गणांसाठी तहसीलदार आरक्षण सोडत काढणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 27 जून रोजी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर 13 जुलै रोजीची आरक्षण सोडतीची प्रक्रिया स्थगिती केली होती. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या सुधारित प्रक्रियेकडे लक्ष लागले होते.
जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकार्यांनी तर पंचायत समिती स्तरावरील आरक्षणाची सोडत तहसीलदारांनी करावी. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्हाधिकार्यांनी उपजिल्हाधिकार्यांपेक्षा कमी नसलेल्या दर्जाचा अधिकारी नेमावा, अशा सूचना आहेत.
आरक्षण सोडत प्रक्रिया अशी आहे
अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला यांच्या आरक्षण सोडतीची सूचना स्वतः जिल्हाधिकार्यांनी 26 जुलै रोजी प्रसिद्ध करायची आहे. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकार्यांनी तर पंचायत समिती निर्वाचक गणासाठी तहसीलदारांनी 28 जुलै रोजी सोडत काढायची आहे. त्यानंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना 29 जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील. तसेच, 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असणार आहे. प्राप्त हरकती, सूचनांचा विचार करून 5 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी हे अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिद्ध करतील.







































































