Last Updated on 18 Feb 2022 5:20 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथील मा.जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात भरविलेल्या १,१११ गडकोट-किल्ल्यांच्या फोटो प्रदर्शनास इस्लामपूरसह संपूर्ण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.तीन दिवसात साधारण ३०-३५ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक, पालक व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.
हे देशातील पहिले व मोठे फोटो प्रदर्शन ठरले असून पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ एव्हीएशन टेक्नॉलॉजी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भारत पाटील (कुची),व इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या प्रदर्शनाचे आयोजन केले. दुर्ग अभ्यासक अँड.मारुती गोळे व संयोजक भारत पाटील यांनी गेल्या ८-१० वर्षात महाराष्ट्रासह १७ राज्यातील ११११ गडकोट- किल्ल्यांना भेटी देवून जे फोटो काढले आहेत, त्या फोटोंचे हे प्रदर्शन होते.
आमदार अरुणआण्णा लाड यांच्या हस्ते बुधवारी या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. भारत पाटील व इस्लामपूर राष्ट्रवादी काँग्रेसने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. नव्या पिढीमध्ये या प्रदर्शनातून निश्चितपणे प्रेरणा निर्माण होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी प्रा.शामराव पाटील, प्राचार्य आर.डी. सावंत,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील,खंडेराव जाधव, पै.भगवान पाटील,बाळासाहेब पाटील,महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर,पिरअली पुणेकर शंकरराव चव्हाण,मुकुंद कांबळे,युवक शहराध्यक्ष सचिन कोळी,कार्याध्यक्ष स्वरूप मोरे,विशाल सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ.लाड यांनी संपूर्ण प्रदर्शन फिरून पाहिले.
संयोजक भारत पाटील म्हणाले, ना.जयंतराव पाटील यांची संकल्पना व मार्गदर्शनाखाली आम्ही प्रथम सांगली आणि नंतर इस्लामपूर शहरात हे प्रदर्शन भरविले आहे. शिवप्रेमींचा उदंड प्रतिसाद लाभला. आपल्या राज्यात ४५० च्यावर गड-किल्ले आहेत. ते आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देत आहेत. आजची पिढी टी.व्ही.,मोबाईलमध्ये अडकली असून त्यांच्यामध्ये शिवप्रेम,देशप्रेम जागृत करून गड-किल्ल्यांच्याबद्दल आकर्षण निर्माण करणे हा आमचा हेतू आहे.

खुल्या नाट्यगृहाचे सभागृह व बाजूच्या शामियान्यात दीड बाय दोनच्या ११११ फोटोंचे हे प्रदर्शन काही ओळीत मांडले होते. सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्ध पुतळा,स्वराज्याची निर्मितीमध्ये अमोघ शौर्य गाजविलेले संताजी घोरपडे,धनाजी जाधव यांच्या काही शूरवीरांच्या तस्वीरीही लावल्या होत्या. तसेच सभागृहात एलईडी लावून त्यावरही गडकोट व किल्ल्यांची माहिती,व फोटो दाखविले जात होते. इस्लामपूर व आष्टा शहरासह वाळवा तालुक्या तील बहुतेक सर्व शाळांच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींनी या प्रदर्शनास भेट देवून फोटो पाहिले,माहिती घेतली.
उर्दू हायस्कुलच्या विद्यार्थी- विद्यार्थिनीही घेतला प्रदर्शनाचा लाभ
येथील उर्दू शाळेतील शिक्षक एम.एम.डंगरे (सर) व या हायस्कुलधील शिक्षक-शिक्षिकांनी आपल्या विद्यार्थी-विध्यर्थिनींना घेवून या प्रदर्शना आनंद घेतला. एम.एम.डंगरे
(सर) म्हणाले,मुलांना इतिहास विषय शिकविताना छत्रपती शिवाजी महाराज व गडकोट-किल्ल्यांचा पराक्रम आम्ही सांगतो. प्रथमच महाराष्ट्र राज्यासह देशातील ११११ किल्ल्यांची माहिती एकत्र मिळत आहे. मुलांना या प्रदर्शनाचा चांगला लाभ होईल.









































































