Last Updated on 18 Sep 2024 5:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्रात सर्वसामान्य माणसाला खात्रीशीर,चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा माफक दरात दिली जाईल,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी व्यक्त केला. कोविड काळात कोणी कशी आरोग्य सेवा दिली,लोकांची कशी लुबाडणूक केली,हे आपणास माहीत आहे. मात्र कृष्णा हॉस्पिटलने सर्वांना समान आणि माफक दरात सेवा देत प्रचंड विश्वासार्हता जपली असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले
इस्लामपूर (कापुसखेड नाका) येथील इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन येथे कासेगाव एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कराड येथील कृष्णा विश्व विद्यापीठ,कृष्णा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या विशेष सहकार्याने सुरू केलेल्या श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील आरोग्य केंद्राच्या (ओपीडी) शुभारंभ समारंभात ते बोलत होते. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, कृष्णेचे वैद्यकीय संचालक डॉ.विजय कणसे, वैद्यकीय प्रशासक डॉ.आर.जी.नानिवडेकर, शामरावकाका पाटील,प्राचार्य आर.डी.सावंत, प्रा.शामराव पाटील,डॉ.नरसिंह देशमुख,डॉ. प्रकाश म्हाळुंगकर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील, सहकार महर्षी जयवंतराव भोसले,श्रीमती कुसुमताई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
आ.पाटील म्हणाले, खरेतर प्रशासकीय इमारतीसमोर शिक्षण संस्थेच्या जागेत,आपण हे केंद्र सुरू करणार होतो. मात्र काही तांत्रिक अडचणी असल्याने आपण हे केंद्र नर्सिंग कॉलेजच्या जागेत सुरू करीत आहोत. हे आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी प्रतिक पाटील यांनी मोठे कष्ट घेतले आहेत. या केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचार कृष्णा हॊस्पिटलमध्ये केला जाईल. तिकडे जा-ये करण्यासाठी २४ तास रुग्ण सेवेची व्यवस्था केली आहे. कृष्णा परिवाराशी आपले अनेक वर्षापासून ऋणानुबंध आहेत. त्यांनी आरोग्य क्षेत्रात मोठी विश्वासाहर्ता निर्माण केली आहे. स्व.जयवंतराव भोसले आप्पांनी ग्रामीण भागातील जास्तीत-जास्त मुलांना डॉक्टर करण्याचे मोठे कार्य केले आहे. ते आज देशासह जगात आरोग्य क्षेत्रात सेवा करीत आहेत.
डॉ.सुरेश भोसले म्हणाले, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी सांगली जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी हा प्रकल्प राबवून प्राथमिक आरोग्य केंद्रांना उर्जितावस्था आणली. हा प्रकल्प आमच्या सातारा जिल्ह्यासह राज्यात जयंत पॅटर्न म्हणून राबविला जात आहे. त्यांचे राजकारणाबरोबर आरोग्य व शिक्षण क्षेत्रात मोठे काम आहे. त्यांनी आता एक मोठे हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करावे. इस्लामपूरमध्ये अद्यावत आरोग्य केंद्र सुरू करण्याचा बऱ्याच दिवसापासून प्रस्ताव होता. प्रतिकदादांनी तो पूर्ण केला आहे. या केंद्रात त्यांनी अतिशय चांगल्या सुविधा दिल्या आहेत. या केंद्रात गोरगरीब रुग्णांच्या बरोबर सर्वांना आरोग्य सेवा दिली जाईल. आरोग्य क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. स्व.बापूंनी ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करून केवळ राहणीमान उंचावले नाही,तर पिढ्या घडविल्या आहेत.
प्रतिकदादा पाटील म्हणाले, आपण राजारामबापू साखर कारखाना व जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे काम केलेले आहे. यातूनच एक कायम स्वरूपाची आरोग्य सेवा असावी हा विचार पुढे आला आणि आणि हे आरोग्य केंद्र सुरू केले आहे. येथे अद्यावत सोई-सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे. प्रा.शामराव पाटील,डॉ.विजय कणसे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्राचार्य आर.डी.सावंत स्वागत भाषणात म्हणाले,आईसाहेबांच्या नावाने आरोग्य केंद्र सुरू करून आरोग्य क्षेत्रात नवे पावल टाकले आहे. भविष्यात या रोपट्याचे विशाल वृक्षात रूपांतर होईल. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर यांनी सूत्र संचालन केले.
नेताजीराव पाटील,विनायक पाटील, देवराज पाटील,विजयराव पाटील,अँड. चिमणभाऊ डांगे,वैभव शिंदे,सभापती संदीप पाटील,सुस्मिता जाधव,डॉ.एन.टी.घट्टे, पै.भगवान पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील,शहाजी पाटील,लिंबाजी पाटील, संजयकाका पाटील,पै.आप्पासाहेब कदम, अविनाश खरात यांच्यासह इस्लामपूर-आष्टा शहरासह तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा सल्ला
आ.जयंत पाटील यांचे राजकारणाच्या पलीकडे जाऊन आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठे काम आहे. त्यांनी एक हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज सुरू करावे,असा सल्ला डॉ.सुरेश भोसले यांनी समारंभात बोलताना दिला. ज्यातले आपणास कळत नाही,त्यात आपण पडू नये,हा आमचा विचार असल्याने आम्ही हॉस्पिटल आणि कॉलेजच्या फंदात पडलो नाही,अशी मिश्किल टिप्पणी आ.पाटील यांनी केली.







































































