Last Updated on 25 Nov 2023 8:13 AM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । चालू हंगामासाठी श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रतिटन रुपये 3200 देणार आहे.एफआरपीपेक्षा प्रतिटन शंभर रुपये जादा देण्यात येणार असल्याचे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत चालू गळीत हंगामासाठी 3100+100= 3200 रुपये व मागील हंगामाचे 50 रुपये देण्याची घोषणा समरजितसिंह घाटगे यांनी शुक्रवारी केली. स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सहकाराभिमुख आदर्शवत तत्वाने आणि श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे (आईसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील व शेतकरी हिताचे निर्णय असे त्यांनी सांगितले.
कागल येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याने सन 2023-24 या चालू गळीत हंगामामध्ये उसासाठी एक रकमी एफआरपी तीन हजार शंभर रुपये यापूर्वी जाहीर केली आहे.सद्य परिस्थितीत त्यात प्रतिटन 100 रुपयांची वाढ करून सन 2023-24 या चालू हंगामामध्ये प्रतिटन 3200 रुपये देण्याचा निर्णय कारखान्याच्या अध्यक्ष सुहासिनीदेवी घाटगे आणि संचालक मंडळाने घेतला आहे.मागील गळीत हंगामासाठी शाहू कारखान्याने प्रतिटन 3000 रुपये दिले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून ऊस दराबाबत शेतकरी संघटना, राज्य सरकार आणि ऊस कारखानादार यांच्यामध्ये चर्चा सुरु होती. परंतु काल झालेल्या शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शेतकरी संघटनांमध्ये यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार यंदाच्या ऊसदराबाबत तोडगा निघाला आहे. यानुसार मागीलवर्षी 3 हजार रुपये एफआरपी दिलेल्या कारखानदारांनी प्रति टन 50 रुपये आणि 3000 रुपयापेक्षा कमी एफआरपी देणाऱ्या कारखानदारांनी 100 रुपये प्रतिटन दर द्यावा, असा निर्णय घेतला आहे.या मान्यतेचे पत्र शाहू कारखान्याच्या वतीने आजच राज्य सरकारकडे पाठवले आहे. त्याची लवकरच पूर्तता होऊन मागील वर्षीच्या ऊस उत्पादकांच्या खात्यावर जी काही रक्कम असेल ती वर्ग करण्यात येईल.
चालू गळीत हंगामाचा कालावधी फारच कमी असल्याने सभासद, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपला सर्व ऊस कारखान्यास पाठवून सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.पत्रकार परिषदेस कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,शेती अधिकारी रमेश गंगाई उपस्थित होते.











































































