Last Updated on 18 Nov 2023 6:55 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । उसाचा दुसरा हप्ता 400 रुपये व यंदाची पहिली उचल 3500 रुपये द्यावी यासाठी विविध पातळ्यांवर आंदोलन केले.आता साखर कारखान्यांवर जाऊन सभासदांची जागृती सुरू आहे.तरीही सरकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे.सरकारला जाग येत नसल्याने रविवारी (दि. 19) राज्यभर चक्काजाम आंदोलन करून शेतकऱ्यांची ताकद दाखवणार आहे,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला.संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
कोल्हापूरात या संदर्भात पार पडलेली शेतकरी संघटना आणि कारखानदारांची तिसरी बैठकही निष्फळ ठरली.अखेरपर्यंत काहीच तोडगा निघाला नाही. बैठकीच्या सुरुवातीसच गोंधळ पाहायला मिळाला मात्र नंतर बैठक सुरू झाली परंतु तोडगा काढण्यात यश आले नाही.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागील हंगामातील 400 रुपयांसाठी कमिटी नेमण्याचा प्रस्ताव दिला होता.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तो धुडकावला आहे. अखेर आता ऊस दराचे आंदोलन पुन्हा चिघळणार असल्याचे दिसते.
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी संघटना ऊसदरासाठी लढत आहे.सर्वच कारखान्यांना ऊसतोडी बंद ठेवण्याचे आवाहन करत आहे. सरकारने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे राजव्यापी रास्ता रोको करून सरकारचे लक्ष वेधणार आहेत.राजू शेट्टी हे हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहे.कोल्हापूर जिल्ह्यात उदगाव टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परितें, आदी ठिकाणी रास्ता रोखो होणार आहे. सांगली. सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन होणार आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे : भागवत जाधव
दरम्यान,वाळवा तालुक्यातील तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी रविवारी दिनांक 19 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्रात माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ऊस दराच्या संदर्भात चक्काजाम आंदोलन होणार आहे.या आंदोलनास सर्वांनी पाठिंबा देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्वाभिमानीचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी केले आहे.
रविवारी सकाळी 10 वाजता इस्लामपूर आंबेडकर नाका,तसेच 12 वाजता तासगाव कराड रोड ताकारी कॅनाल येथे होईल.तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.










































































