Last Updated on 21 Nov 2025 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
३० जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात, १७८ जणांनी घेतली माघार
प्रकाश बनसोडे/उरुण-ईश्वरपूर
ऊरुण ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदराव मलगुंडे आणि भाजपाचे विश्वनाथ डांगे यांच्यातच लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी सहा जण रिंगणात आहेत. नगरपालिकेच्या १५ प्रभागातून ३० जागांसाठी ९४ उमेदवार रिंगणात आहेत.
नगरपालिका निवडणुकीसाठी एकूण २७३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते पैकी १७८ जणांनी आजपर्यंत माघार घेतल्याने ९४ उमेदवार रिंगणात असल्याचे स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसचे शाकीर तांबोळी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. शाकीर तांबोळी यांनी आज माघार घेतली. याबरोबरच नगरसेवक पदासाठी चर्चेत असलेले महाडिक गटाचे अमित ओसवाल यांनी प्रभाग सहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेनेचे सागर मलगुंडे यांनी प्रभाग १३ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दोन्ही प्रभागात चुरशीची लढत होणार असल्याने या दोघांची माघार खूप महत्त्वाची होती. युतीच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतल्याने या दोघांनी माघार घेतली आहे. दोघांनी माघार घेतल्याने या प्रभागातील तणाव निवळला आहे.
बंडखोरीचा अपवाद वगळता जवळजवळ दुरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही दोन प्रभाग वगळता सर्वच प्रभागात बंडखोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही गटाकडून काही महत्त्वाचे बंडखोर थोपविण्यात नेत्यांना यश आले आहे. नगराध्यक्ष पदासाठी एकूण सहा जण रिंगणात असले तरी खरी लढत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आनंदराव मलगुंडे आणि भाजपाचे विश्वनाथ डांगे यांच्यातच लढत होणार आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तुल्यबळ असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. आमदार जयंत पाटील आणि महायुतीचे सर्व नेते यांचा कस लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे विश्वनाथ रामचंद्र डांगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे आनंदराव संभाजी मलगुंडे, याबरोबरच सतीश शिवाजी इदाते, नामदेव शंकर चव्हाण, पंजाबराव साहेबराव पवार व इजाज शहनवाज मुजावर हे उमेदवार रिंगणात आहेत.
नगरसेवक पदासाठी प्रभाग निहाय प्रत्येकी दोन उमेदवार निवडायचे आहेत. प्रभाग क्रमांक एक तीन मध्ये सरळ लढत होत आहे. अन्य प्रभागातील उमेदवारांची संख्या अशी प्रभाग क्रमांक कंसात उमेदवारांची संख्या. प्रभाग क्रमांक (८), प्रभाग क्रमांक चार (५), प्रभाग क्रमांक पाच (७), प्रभाग क्रमांक सहा (९), प्रभाग क्रमांक सात (६), प्रभाग क्रमांक आठ (७), प्रभाग क्रमांक नऊ (९), प्रभाग क्रमांक दहा (७), प्रभाग क्रमांक अकरा (५), प्रभाग क्रमांक १२ (५), प्रभाग क्रमांक 13 (५), प्रभाग क्रमांक १४ (५), प्रभाग क्रमांक १५ (८). ३० जागेसाठी ९४ जन रिंगणात आहेत. दोन्ही गटांचे ६० उमेदवार सोडले तर एकूण ३४ जणांनी बंडखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शाकीर तांबोळी यांची माघार…
काँग्रेसचे पक्षाचे शाकीर तांबोळी यांनी माघार घेऊन नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सागर मलगुंडे यांनी माघार घेऊन विश्वनाथ डांगे यांना पाठिंबा देत युती धर्माचे पालन करणार असल्याचे जाहीर केले.
ईश्वरपूर नगरपालिकेच्या १५ प्रभागासाठी ३० सदस्य संख्या आहे.
पक्षनिहाय उमेदवारांची संख्या अशी…
भारतीय जनता पार्टी १०
काँग्रेस ०
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १०
शिवसेना १०
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ३०






































































