Last Updated on 07 Dec 2023 10:36 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदीबाबत वाळवा तालुक्यातील महसूल अभिलेख्यात आतापर्यंत 3 लाखांवर अभिलेखे तपासणी करण्यात आले.त्यामध्ये 16 हजार 525 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत अशी माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्ह्यात कुणबी मराठा, मराठा कुणबी नोंदी तपासणीचे काम मिशन मोडवर हाती घेण्यात आले.वाळवा तालुक्यातही कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम गतीने सुरु आहे.महसूल विभागाबरोबरच पंचायत समिती,शिक्षण विभाग, राज्य उत्पादन शुल्क, पोलीस,भूमिअभिलेख आदी कार्यालयांमध्ये ही मोहीम सुरु आहे.
वाळवा तालुक्यातील महसूल अभिलेख्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 32 हजार 731 अभिलेखे तपासणी करण्यात आले.त्यामध्ये 16 हजार 525 कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.मराठी व मोडी मध्ये नोंदी आढळून आलेल्या असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी दिली.यातील बहुतांश नोंदी या जन्म मृत्यू नोंदवही तपासणीत मिळाल्या आहेत.त्याचबरोबर सातबारा,आठ अ,फेरफार,कडई पत्रक तपासण्यात येत आहेत.परंतु त्यामध्ये आतापर्यंत नोंदी आढळून आलेल्या नाहीत.तालुक्यातील बहुतांश गावात कुणबी नोंद आढळून आल्या आहे.बहुतांश नोंदी या मोडी लिपीत आहेत.त्याचे भाषांतर करावे लागणार असल्याने त्याला काही कालावधी जावा लागणार आहे.दरम्यान,वाळवा पंचायत समिती आणि शिक्षण विभागामध्ये आतापर्यंत 192 कुणबी नोंदी आढळून आल्या असल्याची माहिती गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी दिली.












































































