Last Updated on 17 Feb 2024 8:19 PM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली | मुलामुलींना आणि तरुणांना अवकाश आणि विश्वाबद्दल आकर्षण असते. ते खूप जिज्ञासू आहेत आणि त्यांची सर्व खगोलीय घटनांबद्दल सर्वकाही जाणून घेण्याची इच्छा आहे. तरुण मनांच्या या उत्कट कुतूहलाला योग्य मार्गदर्शन देण्यासाठी, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शालेय मुलांसाठी “यंग सायंटिस्ट प्रोग्राम” अर्थात “युवा वैज्ञानिक कार्यक्रम” (युविका) या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुण विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान, अवकाश तंत्रज्ञानआणि सध्याच्या काळात अवकाश अभ्यासाविषयी उपयोगात येणारे आधुनिक मूलभूत ज्ञान प्रदान करणे हा आहे. इस्रोने “तरुणांना केंद्रस्थानी ठेवून” हा कार्यक्रम तयार केला आहे. कारण आपण सर्वजण जाणतो की तरुणांना जर त्यांना संधी मिळाली तर ते अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहभागी होऊ शकतात आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करू शकतात. कारण हेच तरुण आपल्या राष्ट्राच्या भविष्याचा पाया (बिल्डिंग ब्लॉक्स) आहेत.
युविका कार्यक्रमामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना विज्ञान,तंत्रज्ञान,अभियांत्रिकी आणि गणित (STEM) आधारित संशोधन आणि त्या अनुषंगिक अभ्यासक्रमामध्ये पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
देशातील ग्रामीण भागाला प्राधान्य देऊन तरुण विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान,अवकाश तंत्रज्ञान आणि अवकाश अभ्यासक्रमाशी निगडित तंत्राविषयी मूलभूत ज्ञान मिळावे ही यंग सायंटिस्ट प्रोग्राम – युविका कार्यक्रमाची संकल्पना आहे. अशा प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील नवीन प्रगत कल समजण्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.या कार्यक्रमात दोन आठवड्यांचे वर्ग प्रशिक्षण, प्रयोगांच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके, कॅनसॅटवर तंत्रज्ञानाविषयी माहिती, रोबोटिक किट, इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत मॉडेल रॉकेट्री संवाद आणि क्षेत्रिय भेटी यांचा समावेश आहे.









































































