Last Updated on 20 Nov 2023 7:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर । दोन दिवसांत निर्णय न झाल्यास गुरूवारी बेमुदत (ता. २३) पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग रोखणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रुपये आणि यावर्षीच्या उसाला तीन हजार ५०० पहिली उचल द्यावी या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे.यावर अद्याप कोणताही तोडगा न निघाल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,ते म्हणाले,पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनावर दबाव आणून जिल्हाधिकारी असो किंवा आणखी काही प्रशासकीय अधिकारी असो त्यांच्याकडून त्यांना हवा तसा अहवाल घेतला आहे तो आम्हाला मान्य नाही. हे असं होणार हे आधीच आम्हाला माहित होतं म्हणून त्या समितीत जायला आम्ही नकार दिला होता.पण समितीसमोर चर्चेला गेलो होतो.तेंव्हा माहिती उपलब्ध करून दिली.हे आकडे त्यांनीच पुरवले असल्याने मी आकडेमोड करून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की माझी आकडेवारी काही वेगळंच सांगते.त्या माहितीच्या आधाराने आम्ही जो हिशेब दिला आहे.त्यानुसार प्रत्येक कारखाना शेतकऱ्याला काही ना काही देणं लागतो.
जिल्हाधिकारी हे पालकमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर
राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांवरही आरोप केले.ते म्हणाले.आधी अहवाल तरी दिला होता.ते म्हणतात पुन्हा माझ्याकडे यादी घेऊन या मी तपासून पाहतो.अहवाल तरी तुम्हीच दिला होता.जिल्हाधिकारी हे पालकमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत.त्यामुळे या समितीवर आमचा अजिबात विश्वास नाही. आम्हाला तो अहवाल मान्य नाही.
आता आरपारची लढाई सुरु…
ते म्हणाले, हे सर्व घडवलंय ते पालकमंत्री हसन मुश्रीफ व आ. सतेज पाटील यांनी…त्यांना शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढायचे आहे.आमचा ऊस आमच्या शेतात आहे.त्यामुळे आमचं काही नुकसान होत नाही.कारखानदारांनी त्यांचा विचार करावा.रविवारी चक्काजामच्या वेळी आम्ही २६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता.त्यामध्ये बदल करून येत्या गुरुवारी २३ नोव्हेंबर रोजी आम्ही राष्ट्रीय महामार्ग रोखणार आहोत.पोलिसांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी.प्रशासनाला जी दडपशाही करायची आहे ती त्यांनी करावी.आम्ही मागे हटणार नाही.आमची आता आरपारची लढाई सुरु झाली आहे.











































































